नाशिक – पाथर्डी शिवारातील आनंदनगर भागात खंडणी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने हॉटेलमध्ये शिरून धुडगूस घातला. हॉटेलची तोडफोड करुन गल्ल्यातील रक्कम बळजबरीने काढून घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवली. आणि चार संशयितांना ताब्यात घेतले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
या बाबत किशोर थोरात (खंडेरावनगर, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. विठ्ठल मते (२१), रितेश लाटे (१९ ), ओम भदरगे (१९, तिघे स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा) आणि सौम्यक उन्हवणे (१९, रॉयल बेकरीजवळ, अश्विननगर, अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. समर्थ आणि अनिकेत नावाचे त्यांचे साथीदार फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. थोरात हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे आनंदनगर भागात एस.के. नावाचे हॉटेल आहे.
संशयित टोळक्याची या भागात दहशत असून व्यावसायिकांकडून ते खंडणी उकळत असल्याचे बोलले जाते. एप्रिलपासून दर आठवड्याला थोरात यांच्याकडून टोळके एक हजार रुपये खंडणी घेत होते. संशयितांनी थोरात यांच्याकडे वाढीव खंडणीची मागणी केली. थोरात यांनी नकार दिल्याने संतप्त टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. थोरात यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने हॉटेलमध्ये तोडफोड केली. हॉटेलच्या गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपये काढून पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी टोळक्यातील चौघांना शोधून काढले.
पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले
जयभवानी रस्त्यावरील चव्हाण मळा भागात पायी जाणाऱ्या महिलेचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी खेचून नेले. याबाबत सौदीराम राजागोपालन ( कदम डेअरी जवळ, श्रीराम कॉलनी, चव्हाण मळा) यांनी तक्रार दिली. राजागोपालन या सकाळी परिसरातील महादेव मंदिरात देवदर्शन करण्यासाठी निघाल्या होत्या. घराबाहेर त्या नणंदची वाट पाहत असता पत्ता विचारण्याचा बहाण्याने जवळ आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळक्याच्या मारहाणीत युवक जखमी
पखाल रस्ता भागात जुन्या वादातून टोळक्याने घरात शिरून युवकाला बेदम मारहाण केली. यात युवक जखमी झाला. या बाबत फैजल रजा इमाम शेख ( २९, कैकशा अपार्टमेंट, गुलशन कॉलनी) या युवकाने तक्रार दिली. मोहसीन शेख, आयेशा शेख, शोएब शेख आणि शबनम शेख (रा.नाशिक) अशी गुन्हा दाखल करणाऱ्या संशयितांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. फैजल शेख आपल्या घरात असताना संशयितांनी त्याला गाठले. जुन्या भांडणाची कुरापत काढली. तू धुळ्याला आल्यास जिवे मारून गायब करू, अशी धमकी देत त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत फैजल शेख जखमी झाला. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.