नाशिक : गंगापूर धरणातील विसर्गामुळे वाहून आलेल्या पानवेलींमुळे रामकुंड ते गाडगे महाराज पूल आणि आसपासच्या भागातील गोदावरीचे पात्र धोकादायक झाले आहे. मंगळवारी दिवसभरात या परिसरात बुडणाऱ्या १० ते १२ जणांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. रात्री गोदापात्रात बुडालेल्या बीडच्या अंबेजोगाई येथील तरुणाचा मात्र मृत्यू झाला. बुधवारी दुपारी केवडीबन भागात त्याचा मृतदेह जीवरक्षकांनी बाहेर काढला.
गंगापूर धरणातून एकलहरे औष्णिक वीज केंद्र आणि गोदावरी कालव्यांना आवर्तनासाठी एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरी पात्रात पानवेलींचा कचरा रामकुंड, गाडगे महाराज पुलासह आसपासच्या भागात वाहून आला. पातळी वाढल्याने पानवेली काढणारे ट्रॅ्श स्किमर यंत्राचे काम थांबवावे लागले. नदीपात्रात ठिकठिकाणी अडकलेल्या पानवेली काढण्याचे काम सफाई कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. या एकंदर स्थितीत गोदावरीचे पात्र पोहण्यासाठी धोकादायक ठरल्याचे समोर आले. पूजा विधी आणि धार्मिक पर्यटनासाठी आलेले भाविक गोदापात्रात डुबकी मारतात. उन्हाळ्यात नदीत पोहण्यासाठी येणाऱ्या स्थानिकांची संख्याही भरपूर असते.
पानवेलींमुळे गोदापात्रात निर्माण झालेल्या स्थितीत दिवसभरात १० ते १२ जण बुडाले होते. त्यांना अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षकांनी सुखरूपपणे बाहेर काढले. यात एका साधुचाही समावेश होता. त्यास कृत्रिम श्वासोश्वास देऊन लगेच जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पंचवटी अग्निशमनचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे यांनी दिली. दररोज सायंकाळी गोदावरीची आरती होते. यावेळी आणि नंतर म्हणजे रात्री सहसा कोणी पाण्यात उतरत नाही. नेमक्या त्यावेळी अंबेजोगाई येथील युवक बुडाला. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जवानांनी शोध घेतला. बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेतले गेले. दुपारी तपोवनातील केवडीबनमधील नदीपात्रात संबंधिताचा मृतदेह हाती लागला. मंगळवारी आणि बुधवारी शोध व बचाव कार्यात पंचवटीचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, किशोर पाटील, बाळू लहामगे, संदीप जाधव. फायरमन नितीन म्हस्के आदी सहभागी झाले होते.
बीडच्या अंबेजोगाई येथील बालाजी मुळे (२७) असे गोदापात्रात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. उन्हाळी सुट्टीत मुळे हे कुटुंबियांसह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक पर्यटनासाठी आले होते. रात्री हे कुटुंब रामकुंड परिसरात आले. बाणेश्वर मंदिरासमोरील पात्रात बालाजी हे बुडाल्याचे सांगितले जाते. नदीपात्रात पानवेलींमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. दिवसभरातील घटनाक्रमातून ते आधीच स्पष्ट झाले होते. प्रदूषित पाण्यामुळे गोदावरीत पानवेली फोफावल्या. प्रवाहित पाण्याने वाहून आलेला पानवेलींचा कचरा पात्रात स्नान करू इच्छिणारे वा उतरणाऱ्यांसाठी धोकादायक ठरल्याचे अधोरेखीत झाले आहे.