लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील कॉलन्यांसह नगरांत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. परिसरात घंटागाडीही येत नसल्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागले असून, त्यामुळे परिसरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर १० दिवसांत कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाला निवेदनातून दिला आहे. मनसेतर्फे यावेळी निदर्शनेही करण्यात आली.
मनसेतर्फे जनहितचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, मनसेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शहराध्यक्ष कुणाल पवार आदींच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक १९ मधील नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी परिसरातील रहिवाशांनी महापालिकेवर धडक दिली. रहिवाशांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात परिसरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देत परिसरातील नागरी समस्यांबाबत रहिवाशांनी व्यथा मांडल्या.
आणखी वाचा-नाशिक : वाहनातून ३७८ किलो गांजा जप्त
नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी भागात २०१६ पासून वीजखांब असून, त्यावर आजपर्यंत पथदिवे बसविले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पक्क्या गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधीयुक्त वातावरण असते. तसेच रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे डास, चिलटांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात घंटागाडीही फिरत नसल्यामुळे कचरा रस्त्यावरच टाकावा लागतो. स्वच्छता कामगारही फिरकत नाहीत. परिसरातील समस्या त्वरीत न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.