नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती

देशात लागणारी तूरडाळ मोठय़ा प्रमाणात आयात करावी लागते. तूरडाळीचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्रात तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याचा शासनाचा विचार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा ही नैतिकता असून चौकशीतून खरे काय ते समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक विभागातील ६० प्रकरणांची बापट यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथील विश्रामगृहात सुनावणी झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला. शिधापत्रिका ‘स्मार्ट कार्ड’मध्ये रुपांतरीत केली जाणार आहे. प्रत्येक शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न असणे बंधनकारक राहणार आहे. लाभार्थ्यांना घासलेट बाजार भावाने देऊन अनुदान संबंधितांच्या थेट खात्यावर जमा केले जाईल. यामुळे काळाबाजार होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. खडसेंच्या राजीनाम्याच्या विषयावर बापट यांनी भाजप सरकार स्वच्छ असल्याचा दावा केला. खडसेंनी नैतिकता बाळगून राजीनामा दिला आहे. चौकशीतून खरे पुढे येईल, असे ते म्हणाले.शिधापत्रिका ‘स्मार्ट कार्ड’मध्ये रुपांतरीत केली जाणार असून त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक राहणार आहे. शिधापत्रिकांना आधार जोडलेले आहे की नाही, याची छाननी सुरू आहे. लाभार्थ्यांना घासलेट बाजार भावाने देऊन अनुदान संबंधितांच्या थेट खात्यावर जमा केले जाईल. यामुळे काळाबाजार होणार नाही, असे प्रतिपादन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले. अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत आतापर्यंत ८०० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. याच महिन्यात मुंबई, पुणे, अमरावती या तीन विभागातील १७५ प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. विभागस्तरावर सुनावणी होत असल्याने नागरिकांचा त्रास वाचतो, शिवाय, त्यांच्या खर्चातही बचत होते, असे यावेळी सांगण्यात आले.

काँग्रेसची पातळी घसरली

पुण्यात एका कार्यक्रमातील भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याचा फोटो आक्षेपार्ह मजकुरासह समाज माध्यमांवर फिरत असल्याच्या प्रकारास गिरीश बापट यांनी काँग्रेसला जबाबदार धरले. काँग्रेसची पातळी घसरली असून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन संबंधितांकडून आरोप होत आहेत. संबंधित महिला आपल्या मुलीसारखी असून काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले.