जळगाव – हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधाच्या आरोपावरून भाजपचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन यांना विरोधकांकडून सातत्याने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर टीका करण्याची कोणतीच संधी सोडलेली नाही. अशा स्थितीत, आपल्या नेत्याची पाठराखण करतानाच त्यांच्या बचावासाठी जिल्ह्यातील भाजपचे आमदार आता मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

जळगावमधील भाजप कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आदी त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या आरोपांचा निषेध करून सर्वांनी खासकरून एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. विशेषतः चाळीसगावचे आमदार चव्हाण यांनी मंत्री महाजन यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल आमदार खडसे यांना लक्ष्य केले. तुम्ही इतक्या वर्षांपासून सीडी शोधत आहात. कुठे आहे ती सीडी, असाही टोला त्यांनी खडसे यांना हाणला.

खडसे साहेब खरेतर तुमचे वय वाढले आहे. आम्ही तर परमेश्वराला सांगू की, तुम्हाला जास्त आयुष्य दिले पाहिजे. कारण, भाजपमध्ये तुम्ही नसताना पक्षाचे सगळे कर्तृत्ववान नेते आणि आमदार कसे काम करतात, ते बघायलाही कोणीतरी असले पाहिजे. विधानसभेतील एखादा सदस्य किंवा एखादा माजी मंत्री ज्यावेळेस काही बोलतो त्याच्याजवळ पुराव्यांचा आधार असला पाहिजे. खडसे यांचेकडे कुठलाही एक पुरावा नसताना ते वारंवार मंत्री गिरीश महाजन यांच्या चारित्र्याचे हनन करतात. त्यांनी कोणत्याही मुद्द्यावर समोरासमोर यावे. वर्षानुवर्षे बिनबुडाचे आरोप करून ते जनमानसामध्ये गिरीश महाजन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो अतिशय चुकीचा आणि लज्जास्पद प्रकार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ खडसे यांनी गेल्या ४० वर्षांत चांगले काम केले असेल, मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना त्यांनी पुरावे देखील दिले पाहिजे. उगाच बेछूट आरोप करू नये. देशासह राज्यात आणि जिल्ह्यात विकासाची गंगा सुरु आहे. मंत्री महाजन यांनी महापालिका कर्जमुक्त करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. शहराच्या विकासासाठी भाजप नेत्यांनी निधी आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, असे आमदार भोळे म्हणाले. यावेळी आमदार जावळे यांनीही खडसे यांनी पुरावा असेल तरच बोलावे. अन्यथा भाजपच्या नेत्यांवर बेछूट आरोप करू नये, असे म्हटले.