जळगाव : ॲड.उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर संसदेच्या कामकाजात आता जळगाव जिल्ह्याचे तीन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दरम्यान, रावेरच्या खासदार रक्षा खडसे या आधीच केंद्रात राज्यमंत्री असताना, त्यानंतर आता ॲड. निकम यांनाही केंद्रीय मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांसदर्भात सूचक विधान केले आहे.
ॲड.उज्ज्वल निकम यांनी वडील बॅरिस्टर निकम यांच्या वकिलीचा वारसा समर्थपणे चालवित असताना, देश-विदेशात गाजलेल्या बऱ्याच न्यायालयीन खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. दरम्यान, ॲड. निकम यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने काही वर्षांपूर्वी त्यांना गळ घातली होती. परंतु, त्यावेळी निकम यांनी राष्ट्रवादीला दाद दिली नव्हती. तशात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उत्तर-मध्य मुंबईसाठी उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
राजकारणात नवख्या असलेल्या निकम यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उमेदवारी करून आपला राजकीय प्रवास सुरू करण्याचा जोरदार प्रयत्नही केला. परंतु, त्यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजप सरकारने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. कायदेशीर पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना संसदेमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न त्याद्वारे केंद्र सरकारने केल्याचे सांगितले जात असले, तरी भाजपच्या आगामी रणनीतीच्या तो एक महत्वाचा भाग मानला जात आहे.
रावेरमधून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या खासदार रक्षा खडसे यांना यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यानंतर आता राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनाही त्यांच्या कायदेविषयक अनुभवाचा विचार करून केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यानुसार ॲड. निकम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यास जळगाव जिल्ह्यास केंद्रात दोन आणि राज्यात तीन, असे तब्बल पाच मंत्री लाभू शकतील. दरम्यान, ॲड. निकम यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळण्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासंदर्भात सूचक वक्तव्य करत आतापर्यंतच्या चर्चांमध्ये काही तरी तथ्य असल्याचे संकेतच दिले आहेत. निकम यांच्यासारख्या अनुभवी कायदेतज्ज्ञाला राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त करताना केंद्रातील भाजप सरकारने निश्चितच काही चांगला विचार केला असेल, असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.