नाशिक : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तपोवन परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर विशेष स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिक बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा तसेच नदीपात्रात वाहून आलेला व साठून राहिलेला कचरा संकलित करण्यात आला. यावेळी २५० ते ३०० किलो कचरा जमा करून घंटागाडीद्वारे तो खतप्रकल्पावर पाठविण्यात आला. सर्व उपस्थितांना स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.

महानगरपालिकेच्यावतीने स्वयंसेवी संस्था जेसीआय ग्रेपसिटी आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. गोदावरी प्रदूषणाचा विषय मागील काही वर्षांपासून सातत्याने गाजत आहे. उच्च न्यायालयाने नदीच्या स्वच्छतेसाठी या विषयाशी संबंधित शासकीय यंत्रणांची समिती व उपसमित्या तयार केलेल्या आहेत. विविध पातळीवर उपाय केले जात असले तरी प्रदूषणाचे प्रमाण आटोक्यात आलेले नाही. पात्रात कचरा फेकण्यास प्रतिबंध आहे. गोदावरी नदीवरील अनेक पुलांवर जाळ्या बसविल्या गेलेल्या आहेत. परंतु, जिथून जागा मिळेल तिथून गोदा पात्रात व काठावर कचरा फेकला जातो.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात ३० पेक्षा अधिक मंदिरांत आता वस्त्रसंहिता, पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वाढते नदी प्रदूषण देखील चिंतेचे कारण बनत असून या सर्व घटकांचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदुषण रोखण्याच्या अनुषंगाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंडे, जेसीआय ग्रेपसिटीचे महेश दीक्षित, सुनील रोकडे, पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.