जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात काहीअंशी घसरण झाली होती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी अचानक दर कोसळल्याने दोन्ही धातू आणखी स्वस्त झाले. दिवाळीच्या मुहूर्ताला महाग दागिन्याची खरेदी करणाऱ्यांवर त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी सकाळी देखील आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस ४,००० डॉलर्सच्या खाली घसरला. देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. चांदीच्या किमतीतही मोठी घट झाल्याने दागिन्यांच्या खरेदीसाठी ही अनुकूल वेळ मानली जात आहे. लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोने आणि चांदी अचानक स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे तर व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घसरण ही सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर दागिने आणि मौल्यवान धातूंच्या मागणीत झालेल्या घटीमुळे झाली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन्ही धातुंच्या किमती कमी होण्यामागे जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता आणि बदलते बाजार संकेत कारणीभूत ठरले आहेत. मात्र, तज्ज्ञांचे मत आहे की दीर्घकालीन काळात सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढीचा कल दाखवू शकतात.

जळगाव शहरात १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख ३५ हजार ४४५ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरू राहिल्याने शनिवारी २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २७ हजार १०२ रुपयांवर स्थिरावले. सोमवारी दिवसभरात पुन्हा ९२७ रुपयांची घट नोंदवली गेली. परिणामी, सोने एक लाख २६ हजार १७५ रुपयांपर्यंत घसरले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा २८८४ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार २९१ रूपयांपर्यंत घसरले.

चांदीत ३०९० रूपयांनी घट

जळगाव शहरात १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ९२ हजार ६१० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरू राहिल्याने शनिवारी चांदीचे दर एक लाख ५७ हजार ५९० रुपयांपर्यंत स्थिरावले. सोमवारी दिवसभरात आणखी २०६० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ५५ हजार ५३० रुपयांपर्यंत घसरले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा तब्बल ३०९० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत घसरले.