जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दराची पुन्हा उच्चांकाकडे वाटचाल सुरू झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत दोन्ही धातुंच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.

लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे आणि ग्राहक पुढील काही महिने सोने आणि चांदीची खरेदी वाढविण्याची शक्यता निर्माण आहे. म्हणून जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल दिसून आला. कमकुवत अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या आक्रमक टिप्पण्यांमुळे शनिवारी देशांतर्गत सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, दोन दिवसांच्या दरवाढीनंतर आता सोन्याचे भाव कमी झाले आहेत. फेडरल रिझर्व्ह सदस्यांच्या टिप्पण्यांवरून असे दिसून आले आहे, की नवीन आर्थिक आकडेवारीचा अभाव असल्याने व्याजदर कपात लांबणीवर पडू शकते. ज्यामुळे आताही सोन्याच्या किमती कमकुवत झाल्या आहेत. डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यामुळे सोन्यावर दबाव वाढला आहे. सोन्याच्या किमती एक लाख ३०,००० रुपयांवरून पुन्हा एक लाख २६,००० रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तरीही आठवड्यात चार टक्क्यांची दरवाढ कायम आहे. सोन्याच्या किमती पुढील काळात प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार ते एक लाख २७ हजार ५०० रुपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जळगाव शहरात गुरूवारी तब्बल २८८४ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ६०४ रूपयांपर्यंत पोहोचले होते. तर शुक्रवारी दिवसभरात १८५४ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत खाली आले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १८५४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २६ हजार ८९६ रूपयांपर्यंत घसरले. दोनच दिवसांत सोन्यात तब्बल ३७०८ रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.

चांदीत दोन दिवसांत इतकी घट

जळगाव शहरात गुरूवारी ७२१० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. तर शुक्रवारी दिवसभरात ३०९० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ६६ हजार ८६० रूपयांपर्यंत खाली आले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा २०६० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ६४ हजार ८०० रूपयांपर्यंत घसरली. दोनच दिवसांत चांदीत तब्बल ५१५० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.