जळगाव : शहरातील सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ६७४ रुपयांपर्यंत पोहोचले होते. शनिवारी १०३ रुपयांची किरकोळ वाढ नोंदविण्यात आल्यानंतर सोन्याचे दर ९८ हजार ७७७ रुपयांपर्यंत गेले. हा सोने दरातील नवीन उच्चांक आहे.अमेरिकेने आयात शुल्कवाढीची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसातच सोन्याच्या दराने पुन्हा जोरदार उसळी घेतली.
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनाही या कालावधीत मोठा परतावा मिळाला आहे. सोने सर्वकालिन उच्चांकावर पोहोचल्यानंतर संबंधितांना बँकेत वर्षभर पैसे ठेवूनही जितके व्याज मिळाले नसते, त्यापेक्षा जास्त परतावा सोन्यात गुंतवणूक केल्याने मिळाला आहे. अगदी कमी कालावधीत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने सोन्यात गुंतवणूक करण्याकडे त्यामुळे अनेकांचा ओढा वाढल्याचे सांगितले जात आहे.
चांदीचे दर स्थिरच
जळगावमध्ये गुरूवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपये होते. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही दिवस कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर स्थिर राहिले. चांदीच्या दरात पुढील दोन-तीन दिवस फार बदल होण्याची शक्यता नसल्याचे व्यावसायिकांनी आधीच सांगितले होते.