जळगाव – शहरातील सराफ बाजारात मंगळवारी ५१५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९९ हजार ३९५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी दिवसभरात १५४५ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नेमके सोन्याचे दर कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम सराफ बाजारातील एकूण उलाढालीवर जाणवला.

दरवाढीमुळे ग्राहकांच्या सोने खरेदी करण्याच्या क्षमतेवर काही दिवसांपासून परिणाम झाला असला, तरी सोन्याचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व कायम अजुनही आहे. त्याचमुळे दरवाढीनंतरही अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या बाजारात बऱ्यापैकी उत्साह दिसून आला. मंगळवारी सोने दरात प्रतितोळा ५१५ रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोने आणखी किती वधारते, त्याकडे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात बुधवारी बाजार उघडताच ५१५ रुपयांची घसरण सोने दरात झाली.

दुपारपर्यंत सोन्याचे दर तसेच कायम राहिले. सायंकाळी पुन्हा १०३० रुपयांची घट झाल्याने सराफ बाजारात बऱ्यापैकी चैतन्य पाहायला मिळाले. दरवाढीमुळे बऱ्याच दिवसांपासून दुरावलेले ग्राहक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी पुढे आल्याने सुवर्ण व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले. सोन्याचा तुकडा तसेच बांगड्या व इतर दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल होता. दरम्यान, गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला (१० मे) सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा ७५ हजार ५०० रुपये इतका होता. त्यातुलनेत यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर सुमारे २२ हजार ३५० रुपयांनी महाग असल्याचे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

सध्या सोन्याचे दर कधी अचानक वाढत आहेत तर कधी अचानक घसरत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामुळे तसेच अमेरिका व चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे हे सर्व घडत असल्याचे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणांमुळे देखील सोन्याचे दर अस्थिर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस सोने दरातील घट कायम राहण्याची शक्यता देखील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

चांदीच्या दरातही चढ-उतार

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच मंगळवारच्या तुलनेत १०३० रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ९४० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, सायंकाळी पुन्हा दरात तेवढीच घट झाल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांवर स्थिरावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरात घट झाल्याने सराफ बाजारात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किमान व्यवहार सुरळीत झाले. त्यातही मोठ्या खरेदीदारांऐवजी किरकोळ ग्राहकांची संख्या जास्तकरून होती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोने व चांदी विक्रीतून होणारी आर्थिक उलाढाल जवळपास १५ ते २० टक्क्यांनी कमी झाली आहे.- विश्वास लुंकड (संचालक- लुंकड ज्वेलर्स, जळगाव</p>