जळगाव : शहरातील सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ६१८ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने प्रतितोळा ९८ हजार ८८० रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत सुमारे ८२४ रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ७०४ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. अक्षय्य तृतियेपर्यंत सोने आणखी कमी होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांची त्यामुळे निराशा झाली.

काही दिवसांपूर्वी सर्वकालिन उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोन्याचे दर अलिकडे नरमले असून, एक लाखांच्या खाली आले आहेत. मात्र, दरात दररोज होत असलेले चढ-उतार लक्षात घेता सकाळी बाजार उघडल्यावर सोने वधारते की घसरते, याचा अंदाज लावणे आता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांसाठी सोपे राहिलेले नाही. अक्षय्य तृतियेला सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. परंतु, त्यादृष्टीने सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना सोने दरातील चढ-उताराने बुचकळ्यात पाडले आहे. आवाक्याबाहेर दर गेल्याच्या स्थितीत अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर ग्राहक आपली आर्थिक कुवत तपासून सोने खरेदी करावे किंवा नाही तसेच सोने खरेदी केलेच तर किती करावे, या विचारात पडले आहेत.

सोने आणि चांदीच्या किमतीत सुरू असलेले सध्याचे चढ-उतार सर्व स्तरातील ग्राहकांवर थेट परिणाम करत असल्याने सुवर्ण व्यावसायिकांचीही चिंता वाढली आहे. सामान्य खरेदीदारांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकाचे गेल्या काही दिवसांपासून सोने दरातील चढ-उताराकडे बारकाईने लक्ष आहे. सोन्याच्या किमती कमी झाल्यास लग्नसराईसह हौस म्हणून दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ती एक पर्वणी असते. दुसरीकडे, गुंतवणूकदारांनाही सोने दरातील घसरणीच्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची संधी मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दरात अजिबात स्थिरता नसल्याने सर्व प्रकारचे ग्राहक सोने खरेदी करण्यापूर्वी मागे-पुढे पाहू लागल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.

चांदीच्या दरात किरकोळ घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगावमध्ये सोमवारी सुमारे १४४२ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर प्रतिकिलो एक लाख १३ रुपयांपर्यंत घसरले होते. मंगळवारी बाजार उघडताच पुन्हा १०३ रुपयांची किरकोळ घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांवर खाली आले. दरम्यान, शुक्रवारपासून कमी-अधिक प्रमाणात सातत्याने दरात घसरण सुरूच असल्याने चांदी आता दोन हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.