प्रचारात सहभाग, पाटर्य़ा झोडणे, प्रलोभन दाखविण्याच्या तक्रारी;चौकशीअंती २४ जणांविरोधात गुन्हा दाखल

कोणी माजी उपमुख्यमंत्र्यांचे, तर कोणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतोय. कोणी मालेगाव बाह्य़ मतदारसंघात निवडणुकीचे काम न करता सेना उमेदवाराचा प्रचार करतोय, पाटर्य़ा झोडतोय. इतकेच नव्हे, तर कोणी प्रचार फेरीत सहभागी होऊन भाजपचा प्रचार करतोय. कोणी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रकारे आदर्श आचारसंहिता खुंटीवर टांगल्याचे उघड झाले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात आचारसंहिता भंग झाल्या प्रकरणी आतापर्यंत ३० तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशीअंती २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषांचे पालन न केल्यावरून राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत असतात. यातील एक तक्रार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक महेश पैठणकर तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक गोटीराम खैरनार यांच्याविरुद्ध आहे.

रत्नाकर गाडे यांनी ही तक्रार केली आहे. पैठणकर, खैरनार हे दोघेही औषधनिर्माते असून आजपर्यंत ते राजकीय पदाधिकाऱ्यांकडे कार्यरत आहेत. संबंधितांकडून शासकीय कर्तव्य पार पाडले जात नसून त्यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे.

मालेगाव येथील तालुका कृषी अधिकारी अशोक पाटील यांच्याविरुद्ध कैलास पाटील यांनी तक्रार केली आहे. अशोक पाटील यांची मालेगाव बाह्य़ मतदारसंघात निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली. परंतु, ते निवडणुकीचे काम न करता शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे यांचा प्रचार करतात, रात्री पाटर्य़ाना जातात, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मालेगाव बाह्य़ मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

महापालिकेतील सफाई कर्मचारी गोविंद तांबोळी हे भाजपच्या प्रचारात सहभागी होऊन मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवत मतदानाचे आवाहन करत असल्याची एक तक्रार आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या विलास गांगुर्डेविरुद्ध प्रचारात सक्रिय असल्याची तक्रार आहे. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गावित यांच्या विरोधात ते इगतपुरीतील सेना उमेदवार निर्मला गावित यांच्यासाठी मतदारांना प्रभावित करण्याचे कृत्य करत असल्याची तक्रार आहे.

या संदर्भात संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांच्या प्रचार पत्रकावर छापणाऱ्याचे नाव आणि पत्ता नसल्याने मनसेचे पदाधिकारी डॉ. प्रदीप पवार, अनंता सूर्यवंशी, अंकुश पवार आणि समर्थ एंटरप्रायजेस या मुद्रकाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच स्वरूपाचा एक गुन्हा याच मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेला आहे. रत्नाकर गाडे यांनी याबाबत लेखी तक्रार दिली. जिल्ह्य़ात आतापर्यंत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक सहा गुन्हे नाशिक मध्य मतदारसंघांत आहेत. मालेगाव मध्यमध्ये पाच, मालेगाव बाह्य़, दिंडोरी, येवला, बागलाणमध्ये प्रत्येकी एक, निफाड आणि कळवणमध्ये प्रत्येकी तीन, इगतपुरीत तीन गुन्हे दाखल आहेत. उर्वरित नांदगाव, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली या मतदारसंघांत आचारसंहितेचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.