जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होत असलेल्या १४ फेब्रुवारी या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी एकनिष्ठ व सनविवि फाऊंडेशन यांच्यातर्फे शहरात प्रथमच आजी-आजोबा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता स्व. प्रमोद महाजन उद्यानात होणार आहे. आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यातील उबदार नात्याला एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
आजी-आजोबांपासून ते नातवंडापर्यंत असलेले उबदार नाते तीन पिढय़ांच्या घट्ट बंधनात घर टिकवून असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात विशेषत: आई-बाबा दोघेही नोकरी करत असतांना आजी-आजोबांसाठी त्यांना वेळ मिळतो का, हा प्रश्न आहे. त्यामुळे नातवंडांना शाळेतून आणण्या-नेण्यापलीकडे त्यांचा सहवास लाभतो. ज्या घरी आजी-आजोबा नसतील तेथे काय, हादेखील प्रश्न आहे. या नात्याला एकत्रित आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याआधी नमस्कार फाऊंडेशनकडून तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत होता. त्यात एका नातवाने आपल्या आजी-आजोबांना वृद्धाश्रमातून परत घरी आणले हे या उपक्रमाचे यश आहे. यंदा हा कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास शहरातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आपल्या नातवंडांवर भरपूर माया व प्रेम करणारे आजी-आजोबा आणि त्यांच्या छत्रछायेखाली आनंद द्विगुणित करणारे नातवंडे अशा मनोहारी स्नेह मेळाव्यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र तसेच ‘सेल्फी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आपल्या आजी-आजोबांसोबत असलेले छायाचित्र तसेच सेल्फी या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्गाकडून घेतले जातील. त्यामधून निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. छायाचित्र तसेच सेल्फी देण्यासाठी ९९६०३ ३८८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.