जिल्ह्य़ात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील ७० टक्के बागांचे अवकाळी पावसाने कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. निफाडच्या काही भागात गारपिटीने झोडपले तर बागलाणमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. निसर्गाच्या प्रकोपाने क्षतिग्रस्त झालेल्या द्राक्षांच्या निर्यातीची शक्यता धुसर झाली आहे. या संकटाने द्राक्ष उत्पादक मानसिकदृष्टय़ा खचला असून त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असून यंदा पाऊसमान, हवामान चांगले असल्याने कधी नव्हे, ते जादा उत्पादनाची आशा शेतकरी बाळगून होता. परंतु, त्याची स्वप्न पावसाने धुळीस मिळाली. बागलाण तालुक्यात हंगामपूर्व अर्थात अर्ली द्राक्ष पीक घेतले जाते. त्यास भाव चांगला मिळतो. पण तो उत्पादकांसाठी अातबट्टय़ाचा खेळ ठरला. काही दिवसांत जो माल निर्यात करायला आहे तो जमीनदोस्त झाला. अनेक तालुक्यात पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले. द्राक्ष बागाईतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र पुढे आले. निफाड तालुक्यातील श्रीरामनगर, कोळवाडी, नैताळे परिसरात बुधवारी रात्री तासभर गारपिटीने झोडपले. जिल्ह्य़ातील सर्व भागात दररोज किमान १० ते अधिकतम ६० मिलिमीटर पाऊस पडत आहे. यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील द्राक्ष पीक संकटात सापडले आहे. निफाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये आजही तळे साचल्याची स्थिती आहे.
ही संपूर्ण स्थिती लक्षात घेऊन नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, संपूर्ण पीक कर्ज, त्यावरील व्याज माफ करून परत पीक कर्ज देण्याची व्यवस्था करावी, मध्य मुदत कर्जावरील व्याजास तीन वर्षे माफी, परतफेड, पुनर्गठन करून मिळावे, द्राक्ष उत्पादकांना भरावा लागणारा शासकीय शेतसारा, शिक्षण कर, वीज देयक माफ करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे संघाने केली आहे.
कुठे बागा कुजल्या, कुठे घड जमीनदोस्त
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागा पावसामुळे कुजून गेल्या आहेत. मणी धरलेल्या अवस्थेतील बागांमध्ये पाऊस, वादळाने घडांची नासाडी झाली. जुले, ऑगस्टमध्ये छाटणी झालेल्या सटाणा, मालेगावमधील तयार असलेल्या द्राक्षबागांचे पूर्णत: नुकसान झाले. चांदवड परिसरात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये छाटण्या झाल्या असून तेथील बागांचे ८० टक्के नुकसान झाले. निफाड तालुक्यातही १०० टक्के बागांच्या छाटण्या असून तिथे ७० टक्के नुकसान आहे. नाशिक, सिन्नर तालुक्यात सप्टेंबरमध्ये ९९ टक्के छाटण्या झाल्या होत्या. या भागात बागांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले, असे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी सांगितले.नुकसान झाले. चांदवड परिसरात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये छाटण्या झाल्या असून तेथील बागांचे ८० टक्के नुकसान झाले. निफाड तालुक्यातही १०० टक्के बागांच्या छाटण्या असून तिथे ७० टक्के नुकसान आहे. नाशिक, सिन्नर तालुक्यात सप्टेंबरमध्ये ९९ टक्के छाटण्या झाल्या होत्या.या भागात बागांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले, असे द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी सांगितले.