विकास कामांसाठी नगर विकास मंत्रालयाकडून हिरवा कंदील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव : नगरोत्थान योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी नगरविकास मंत्रालयास सादर करण्यात आलेल्या मालेगाव महापालिकेच्या १२५ कोटींच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याची घोषणा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित अभिष्टचिंतन सोहळय़ात त्यांनी ही घोषणा केली.

शिवसेना आणि मालेगावचे अतूट नाते आहे. त्यामुळे मालेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. नगर विकास मंत्रालयांतर्गत असणाऱ्या शहरातील विकास कामांना तात्काळ मंजुरीसह शहर आणि तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांना निधी प्राप्त होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. ‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी कृषिमंत्री म्हणून अविरत परिश्रम घेत असल्याबद्दल शिंदे यांनी भुसे यांची यावेळी प्रशंसा केली. अत्यंत संवेदनशील असलेल्या कृषि खात्याचा कारभार हाकतांना भुसे हे नेहमीच सजग असतात.

शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी थेट बांधावर जातात, शेतीत नवनवीन प्रयोग व आधुनिकता आणण्यासाठी धडपड करीत असतात, शेतकरी स्वावलंबी व्हावा हाच त्यांचा ध्यास असतो,असा उल्लेखही शिंदे यांनी केला. यावेळी भुसे यांनी आजवर जनतेने आपल्याला जेवढे दिले ते ऋण कधीच फेडता येणार नाही, असे नमूद करत आगामी वर्ष हे मालेगावच्या विकासासंदर्भात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे असेल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने येथील यशश्री कम्पाऊंडमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सुहास कांदे, नरेन्द्र दराडे, निर्मला गावीत या आमदारांसह सेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, विजय करंजकर,उपमहापौर नीलेश आहेर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय दुसाने, रामा मिस्तरी, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव,शहरप्रमुख राजाराम जाधव, बाजार समितीचे सभापती भटू जाधव, उपसभापती सुनील देवरे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green light ministry urban development development works ysh
First published on: 08-03-2022 at 02:58 IST