नाशिक – चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी जगदीश पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा >>> “…तर पंकजा मुंडेंबरोबर युती करू”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊन तक्रारदाराचे पाच ते सहा लाखाचे नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्यकर अधिकारी जगदीश पाटीलने ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. वस्तू व सेवा कर विभागाच्या इंदिरानगर कार्यालयात ४० हजार रुपये स्वीकारत असताना पाटील यांना पकडण्यात आले. या कारवाईने जीएसटीत कार्यालयात खळबळ उडाली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पाटीलला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्वप्निल राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.