गोदावरीच्या पातळीत वाढ; सखल भागांतील घरे, दुकानांमध्ये पाणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्य़ाच्या काही भागांस पावसाने झोडपले. दुपारनंतर सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. पावसामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ होऊन गोदाकाठ परिसरातील नदीपात्रात असलेली पर्यटकांची काही वाहने पाण्याखाली गेली. गोदावरी-वाघाडी संगमाजवळ अडकलेल्या चार ते पाच जणांची स्थानिक युवकांनी दोरीच्या साहाय्याने सुटका केली.

शनिवारी सायंकाळी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पावसामुळे कांदा, टोमॅटो आणि द्राक्ष बागायतदारांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हादरले असताना रविवारीही दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसास सुरुवात झाली. साडेतीन ते साडेपाच या दोन तासांत शहर परिसरात ४० मिमी पावसाची नोंद झाली.

विशेष म्हणजे गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची नोंद झाली नसताना आणि गंगापूरमधून विसर्ग करण्यात आला नसतानाही परिसरातील नाले आणि गटारांच्या पाण्यामुळे गोदाकाठ परिसरात नदीच्या पातळीत वाढ झाली. होळकर पुलाखालील बंधाऱ्यातून अचानक पाणी वाढल्याने नदीपात्रातील पर्यटकांची वाहने अडकली. टपऱ्यांमध्ये पाणी शिरले. गाडगे महाराज पुलाजवळ गोदावरीला येऊन मिळणाऱ्या वाघाडी नदीवर असलेल्या चेंबरवर आणि समाधी मंदिरात चार ते पाच जण अडकले. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्याच वेळी स्थानिक युवकांनी दोरीच्या साहाय्याने सर्वाची सुटका केली. या पावसाने शहरातील सराफ बाजार, फुल बाजारात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. काहींचा माल वाहून गेला. गटारींवरील झाकणांभोवतीचा कचरा दूर केल्यानंतर पाणी त्वरेने कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आली. पावसामुळे शहराच्या अनेक भागांत झाडाच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही सायंकाळी पाऊस झाला. पाचच्या सुमारास मनमाड परिसरात मुसळधार पावसामुळे आठवडे बाजारात पाणी साठल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सध्या बाजरी, मका काढणीला आली असून पावसामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय बाजारात ‘अर्ली’ येणाऱ्या द्राक्षांनाही याचा फटका बसला आहे. मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाची पातळी सुमारे ४५ सेंटीमीटरने वाढली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall in nashik abn
First published on: 07-10-2019 at 00:57 IST