नाशिक : उमेदवारी अर्ज छाननीत नाशिकमध्ये तीन तर, दिंडोरीत पाच जणांचे अर्ज वेगवेगळ्या कारणांनी अवैध ठरले. नाशिक लोकसभा मतदारसंघात आता ३६ आणि दिंडोरीत १५ उमेदवार मैदानात आहेत. दोन्ही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांना शांत करण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू असून सोमवारी दुपारपर्यंत माघारीची मुदत आहे.

नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया शनिवारी पार पडली. नाशिक मतदारसंघात ३९ पैकी तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीसमोर माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या बंडखोरीचे आव्हान आहे. शिवसेना शिंदे गट अर्थात महायुतीला अपक्ष मैदानात उतरलेले शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद गुरूस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती या महंतांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे. तशीच स्थिती दिंडोरी मतदारसंघात आहे. या मतदारसंघात २० पैकी १५ उमेदवारांचे अर्ज वैध तर पाच जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.

हेही वाचा…पंतप्रधानांच्या नियोजित सभेमुळे कांदा निर्यातबंदी शिथिल – विरोधकांची टीका, भाजपचे

नावात विसंगती असल्याने आणि एमआयएमतर्फे दाखल अर्जात १० सूचक नसल्याने खान गाजी इकबाल अह मुबीन खान, अर्जासोबत १० सूचक नसल्याने एमआयएमकडून अर्ज दाखल करणारे काशिनाथ वटाणे, जात प्रमाणपत्र न जोडल्याने संजय चव्हाण, मुख्य उमेदवाराचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने पर्यायी उमेदवार सुभाष चौधरी आणि याच कारणास्तव पल्लवी भगरे या पाच जणांचे अर्ज अवैध ठरले. दिंडोरीत आता १५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माकपचे उमेदवार जिवा पांडू गावित यांची बंडखोरी अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान ठरणार आहे.

दोन्ही मतदारसंघातील बंडखोरी रोखण्याकडे प्रमुख राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. माघारीसाठी सोमवारी दुपारपर्यंतची मुदत आहे. बंडखोरांची समजूत काढून त्यांना माघारीसाठी तयार करण्याचे शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. माघारीच्या मुदतीनंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा…नाशिक : त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

संजय चव्हाण यांचा अर्ज अवैध

दिंडोरी या राखीव लोकसभा मतदारसंघात जातीचा दाखला उमेदवारांनी अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते. तथापि, जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले नसल्याने संजय चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.