इगतपुरी ते नाशिक, मालेगाव ते धुळेदरम्यान सराईतांचा वावर

नाशिक : जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर सराईतांकडून लूटमारीच्या घटना मोठय़ा प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. महामार्गाने चारचाकी किंवा दुचाकीने एकटय़ा-दुकटय़ा जाणाऱ्यांना अडवून मारहाण करीत लूट केली जात आहे. त्यासाठी कोणतेही कारण पुढे केले जात असून प्रामुख्याने इगतपुरी ते नाशिक तसेच मालेगाव ते धुळे यादरम्यान अशा घटना अधिक होत आहेत.

जिल्ह्यात इगतपुरी ते नाशिकदरम्यान महामार्गावर शनिवार, रविवारी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. आठवडय़ाचे शेवटचे दोन दिवस बहुतेकांना सुट्टीचे असल्याने या दिवशी अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या संख्येत या दोन दिवशी अधिक वाढ होते. या संधीचा फायदा सराईत गुन्हेगारांकडून घेतला जात आहे.  सराईत गुन्हेगार हे महामार्गावर एकटय़ा-दुकटय़ा प्रवाशांना हेरतात. त्यांना घेरून धारदार शस्त्र अथवा जीवघेण्या हत्याराचा धाक दाखवीत धमकाविणे, जेवणासाठी हॉटेलवर थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून वाहनातील वस्तू, पैसे लांबविणे, अशा घटना महामार्गावर सर्रासपणे होत असतात.  अशीच एक घटना रविवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील बोरटेंभा शिवारात गुरुद्वारासमोर घडली.

बेलापूर (मुंबई) येथील कुटुंब औरंगाबादकडे वाहनाने जात असताना हॉटेलमध्ये जेवण्यासाठी सायंकाळी बोरटेंभा शिवारात थांबले होते. हॉटेलसमोर चारचाकी वाहन उभे करण्यात आले होते. सराईतांनी दुचाकीवर येत चारचाकी वाहनाची काच फोडून ऐवज चोरण्याचा प्रयत्न केला. चोरीचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबातील पुरुषाने नागरिकांच्या साहाय्याने पाठलाग करून घोटी टोल नाक्यावर सराईतास रंगेहाथ पकडले. प्रवाशाने तातडीने घोटी पोलिसांशी संपर्क साधत चोराला पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संतोष लहानु लहमटे (रा. वाडी, कोळीवाडा) सांगितले. त्याच्यासोबतचा दुचाकीस्वार साथीदार परदेशी हा पळून गेला. घटना इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात चोरटय़ाला देण्यात आले. निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक तुषार साळुंके, हवालदार सचिन देसले, सचिन मुकणे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच या चोरीच्या प्रकरणातील संशयित हा सराईत गुन्हेगार निघाला. विशेष म्हणजे त्यावर विविध पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. पोलिसांना अनेक गुन्ह्यांत हा सराईत गुन्हेगार हवा होता. इगतपुरी न्यायालयात त्यास हजर केले असता जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली.

किरकोळ कारणे पुढे करून वाद

कारचालक, दुचाकी स्वारांना महामार्गावर लुटण्याचे प्रकार मालेगाव ते धुळे दरम्यानही होत असतात. त्यासाठी गाडीला कट लागल्याचे कारण पुढे केले जाते. वाहतूक पोलिसांकडून महामार्गावर वारंवार गस्त घालणे आणि महामार्गावरील हॉटेल, धाब्यांवर जनजागृती करणे यासारख्या उपाययोजना केल्यास अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटनांना पायबंद बसू शकेल.