जळगाव – हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू असताना, दोन्ही नेत्यांचे समर्थक कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. प्रतिमांना शाई फासण्यासह जोडे मारण्याचे प्रकार सुरू झाल्याने जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, दोघांमधील वाद काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने जिल्ह्यातील नागरिक त्यांना आता कंटाळले आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गज मानले जाणारे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात एकेकाळी गुरू-शिष्याचे नाते होते. दोघांनी उत्तर महाराष्ट्राला विकासाचे स्वप्न दाखविण्याचे काम केले होते. मात्र, भाजपमध्ये काम करत असतानाच दोघांमधील संबंध अचानक ताणले गेले. खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही दोघांमधील कलगीतुरा कायम राहिला. दोघांमधील राजकीय वाद कमी होण्याऐवजी आणखी विकोपाला गेला. हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर दोघांमधील शाब्दिक युद्धाने तर विखारी वळण घेतले आहे. एकमेकांवर आरोप करताना कुटुंबियांना मध्ये आणण्यासही ते मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून आले आहे.
हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत असलेला संशयित प्रफुल्ल लोढा हा जामनेर तालुक्यातील मूळ रहिवाशी आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लक्ष्य करण्याची संधी साधली. तसेच हनी ट्रॅपमध्ये महाजन यांचाही सहभाग असल्याचा सनसनाटी आरोप करून सर्वत्र खळबळ उडवून दिली. तेवढ्यावरच न थांबता लोढा हा मंत्री महाजन यांच्या कारनाम्यांची सीडी मला देणार होता. मात्र, महाजनांनी त्याचे पाय धरून ती सीडी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. आणि त्याच सीडीसाठी पोलीस लोढाच्या घराची वारंवार झडती घेत असल्याचा आरोप खडसे यांनी केला. दुसरीकडे मंत्री महाजन यांनीही निखिल खडसे आत्महत्या प्रकरणावर संशय व्यक्त करून खडसेंना डिवचले. दरम्यान, खडसेंनी कोंडीत पकडलेल्या आपल्या नेत्याच्या बचावासाठी जळगावमधील भाजप आमदार मैदानात उतरले. त्यांनी पत्रकार परिषदेतून खडसेंचा चांगलाच समाचार घेतला.
त्यानंतर पुणे रेव्ह पार्टी प्रकरण उजेडात आले आणि खडसे-महाजन वादाचा दुसरा अंक सुरू झाला. दोन्ही नेते एकमेकांवर जिव्हारी लागणारी टीका करत असताना रूपाली चाकणकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करून जळगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खडसेंच्या व्यंगचित्राला शाई फासली. त्यास जशास तसे उत्तर देण्यासाठी शरद पवार गटानेही खडसेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. याशिवाय, मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारले. हनी ट्रॅपमधील संशयित प्रफुल्ल लोढाची नार्को चाचणी करण्यासह संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.