धुळे – शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांविरुध्द कारवाई करण्यात येत असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असताना हे शहर जणू अवैद्य धंद्यांची राजधानी झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांनी केला आहे. दोन नंबरचे धंदे तत्काळ बंद करण्याची मागणी करत त्यांनी शहरात किती ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत, त्याची संख्याही जाहीर केली.
रणजीतराजे भोसले यांनी मंगळवारी धुळे शहरातील अवैद्य धंद्यांविरुद्ध आवाज उठविण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. वाढत्या गुन्हेगारीचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. धुळे शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जवळपास ३६७ ठिकाणी अवैद्य धंदे सुरू आहेत. यात प्रामुख्याने हाणामारी, हत्या, दरोडे, चोऱ्या, सट्टा, मटका, गांजा, सोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैधरित्या जनावरे वाहतूक, वाळू तस्करी, बनावट डांबर, अशा विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या बेकायदेशीर धंद्यांना राजकीय, प्रशासकीय आणि पोलीस विभागातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडूनच पाठबळ मिळत आहे. यामुळे धुळे शहराचे वातावरण कलुषित झाले आहे. गोरगरीब, कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यातून कोट्यवधी रुपये कमवून काही अधिकारी, कर्मचारी गब्बर झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरात गुंडगिरी, दादागिरी, चौकाचौकात गुंडांची टोळकी, यांचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नव्हे तर, शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी बंदूक, तलवारी, चाॅपर, फायटर, बेकायदेशीर हत्यारे दिसून येतात. अशी प्राणघातक हत्यारे मिरवणाऱ्यांना कोणाचेही भय राहिलेले नाही. शाळकरी विद्यार्थ्यांकडेदेखील अशी हत्यारे दिसून येत असतील तर ही बाब अत्यंत धोकादायक आहे. या वाढत्या गुन्हेगारीला घाबरून बाहेरील जिल्ह्यातील लोक धुळ्यात येण्यास आणि स्थायिक होण्यास घाबरत आहेत. परिणामी, या प्रकारांमुळेच शहराचा विकास खुंटत आहे. पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम सुरु करावी आणि अवैद्य धंदे त्वरित बंद करावेत, यासाठी विविध ठिकाणी छापा टाकावा. बेकायदेशीरपणे गावठी बंदूक, तलवारी, चाॅपर, फायटरसारखी हत्यारे बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई करावी, अशी बेकायदेशीर हत्यारे जमा करावीत, अशा मागण्या रणजीतराजे भोसले यांनी केल्या.
धुळे शहरात वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल आपण स्वतः पाच मे रोजी आणि नंतर जून महिन्यातही पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन बेकायदेशीर धंदे आणि वाढणाऱ्या गुन्हेगारीबद्दल निवेदन दिले होते. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे अखेर अवैध धंद्यांचे पुरावे शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू आणि भयावह स्थिती निदर्शनास आणून देऊ. – रणजीतराजे भोसले (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी, धुळे)