नाशिक – चोरीस गेलेल्या भ्रमणध्वनीचा गैरवापर करुन चोरट्यांनी फोन पेच्या माध्यमातून बँंक खात्यातील ३६ हजाराची रोकड परस्पर काढून घेतली. याबाबत सुधाकर महाजन (६६, संभाजी स्टेडिअम जवळ, अश्विननगर) यांनी तक्रार दिली.
महाजन सिडकोतील शिवाजी चौक परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे १० हजार रुपयांचा भ्रमणध्वनी चोरला. या घटनेस दोन दिवस झाल्यानंतर चोरट्यांनी भ्रमणध्वनीचा गैरवापर करीत महाजन यांच्या बँक खात्यातील पैसे लंपास केले. फोन पे माध्यमातून त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून २१ हजार ६३० आणि १४ हजार ७४० रुपये परस्पर काढून घेण्यात आले. त्यातील काही रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आली. दुसऱ्या रकमेतून ऑनलाईन खरेदी करण्यात आली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोलकरणींचा संशयास्पद मृत्यू
धुणी भांडी करण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचा मृतदेह इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत आढळून आला. काळेनगर भागात हा प्रकार उघडकीस आला. अश्विनी इंगोळे (३३, संत कबीरनगर, भोसला शाळेमागे, आनंदवल्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. इंगोळे या काळेनगर भागात धुणीभांडी करण्याचे काम करत होत्या. शनिवारी त्या सुयश सोसायटीत गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यत त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. रविवारी त्यांचा मृतदेह ज्या इमारतीत कामास गेल्या होत्या, त्याच सुयश अपार्टमेंटच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत आढळला. गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दोघांची आत्महत्या
वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. नाणेगाव येथील अंकुश जाधव (६५) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांंनी त्यांना तातडीने छावणी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. सोनू जाधव (३५, वास्तू ग्रंथ अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी नाशिकरोड येथील बिटको पॉईंट परिसरातील डॉमिनोझ भागात विषारी औषध सेवन केले होते. चुलतभाऊ लॉरेन्स जाधव यांनी त्यांना बिटको रुग्णालय आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.