लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित बैलगाडा शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे एकच सावळागोंधळ उडाला. शर्यत मार्ग बंदीस्त नसल्याने उत्साही प्रेक्षक थेट मार्गावर येत होते. त्यात काही जण जखमी झाले. प्रेक्षकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सायंकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.
म्हसरूळ ग्रामस्थ आणि सोमनाथ वडजे यांच्या पुढाकारातून मंगळवारी म्हसरूळ-मखमलाबाद जोड रस्त्यावरील ठक्कर मैदानावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यंत अनेक कारणांमुळे गाजली. बैलगाडा शर्यतीसाठी स्थानिक आमदार राहुल ढिकले उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांसाठी बुलेट, मोटारसायकल, ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार रुपयांसह दीड हजार रुपयांची अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती. शर्यतीत इतक्या बैलगाड्या सहभागी झाल्या की, आयोजकांनी त्याची कल्पना केली नव्हती. दुपारी एक वाजता नारळ वाढवून शर्यतीला शुभारंभ झाला.
आणखी वाचा-नाशिक: विभागातील २९०४ वाड्या-वस्त्यांच्या जातीवाचक नावात बदल
रणरणत्या उन्हात मैदान प्रेक्षक व बैलगाड्यांनी भरून गेले होते. चार ते पाच बैलगाड्या एकाच वेळी धावू शकतील अशी शर्यत मार्गाची व्यवस्था होती. पण हा मार्ग बंदीस्त नसल्याने धावणाऱ्या बैलगाड्यांसमोर प्रेक्षक अडथळा ठरले. धावत्या बैलगाड्यामध्ये आलेले काही प्रेक्षक जखमी झाले. एक युवक बैलगाडीवरून पडून जखमी झाला. सायंकाळपर्यंत सात ते आठ जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. शर्यंतीवेळी प्रेक्षकांनी गोंधळ घातला. काही जण थेट शर्यत मार्गावर धावत होते. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सायंकाळी सहापर्यंत शर्यतीत २०० बैलगाड्या सहभागी झाल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत ही शर्यत सुरू राहणार आहे.