जळगाव जिल्ह्यात पाचोरा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत एका वाहनातून ४०० लिटरची ताडी जप्त करण्यात आली. वाहनासह पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्याच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतूक करणार्‍यांविरोधात धडक मोहीम राबविली जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विजय भुकन यांच्या नेतृत्वात २२ डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतूक करणार्‍यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील, पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी शनिवारी जामनेर- बोदवड रस्त्यावर संशयास्पद वाटणारी भरधाव मोटार पकडली. मोटारीत ४०० लिटर तयार ताडी मिळून आली. संशयित मोहंमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… जालना-मुंबई वंदे भारतच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी स्थानकावर; भाजपा- शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन, वंदे भारतचे महाराष्ट्र कन्येकडून सारथ्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव जिल्ह्यात ढाब्यांसह हातगाड्यांवर कारवाई

जळगाव जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर अवैध धंद्यांसह बनावट दारूचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सहा-सात दिवसांत अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या ३५ पेक्षा अधिक ढाब्यांसह हातगाड्यांवरही कारवाई करीत मद्यसाठा जप्त केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखावर मद्यप्राशनासाठी लागणारे परवाने देण्यात आले असून, देशीसाठी दोन रुपये, तर विदेशी मद्यासाठी पाच रुपये शुल्क आहे. एका दिवसाच्या परवान्यासाठीही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले. कायद्याच्या चौकटीत राहूनच सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करा, यादृष्टीने प्रशासन सज्ज आहे. कुठलाही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा अधीक्षक डॉ. विजय भुकन यांनी दिला आहे.