नाशिक – बागलाण तालुक्यात धान्य दळून दिल्याचे देयक बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने आठ हजार रुपयांची लाच स्वीकारली. रक्कम मोजली. त्याचवेळी सापळ्याचा संशय आल्याने मुख्याध्यापक महाशयांनी लाचेची रक्कम तिथेच सोडून स्वत:च्या कार्यालयातून दुसऱ्या दरवाजाने धूम ठोकली.
बागलाण तालुक्यातील ननाशी येथील शासकीय आश्रमशाळेत हा प्रकार घडला. जितेंद्र सोनवणे (४५) असे या संशयित मुख्याध्यापकाचे नाव आहे. तक्रारदार हे रोजंदारी शिक्षक आहेत. त्यांचा घरघंटीचा (छोटी पिठाची गिरणी) व्यवसाय आहे. शासकीय आश्रमशाळेतील धान्य दळून देण्याचा ठेका त्यांच्याकडे आहे. या दळणाचे ८७ हजार ४८० रुपयांचे देयक मुख्याध्यापक सोनवणे यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यावर जमा केले. या मोबदल्यात बक्षीस म्हणून आठ हजार रुपये. आणि मार्च २०२५ या महिन्याचे दळणाचे देयक मंजूर करण्यासाठी १३०० रुपये अशी एकूण ९३०० रुपयांची लाच मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणेने मागितली होती. तडजोड म्हणून आठ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पथकाने सापळा रचला. मुख्याध्यापक सोनवणे यांनी कार्यालयात तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्वीकारले. ही रक्कम मोजत असताना त्यांना संशय आला. तक्रारदार कार्यालयाबाहेर इशारा करण्यासाठी जात असताना मुख्याध्यापक सोनवणेंनी लाचेची रक्कम टेबलावर ठेवली. आणि दुसऱ्या दरवाजाने स्वत:च्या कार्यालयातून पळून गेले.
या प्रकरणी मुख्याध्यापक सोनवणे याच्याविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या मुख्याध्यापकाचा शोध सुरू आहे. त्यांच्या घराची झडती घेतली जात असल्याची माहिती विभागाने दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक स्वाती पवार यांनी काम पाहिले. सापळा पथकात हवालदार शरद हेंबाडे, पोलीस नाईक युवराज खांडवी, हवालदार संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता.