नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना सटाणा नगरपरिषद निवडणुकीत महायुती होईल किंवा नाही,याविषयी नेते वेगवेगळी वक्तव्ये करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांची स्वतंत्र यादी पक्षश्रेष्ठींकडे दिल्यामुळे पक्ष स्वबळाच्या तयारीत आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या खासदार डाॅ. शोभा बच्छाव यांनी मात्र सटाणा नगरपरिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येईल, असे सांगितले.

सद्यस्थितीत सटाणा नगर परिषदेच्या १२ प्रभागातील २४ तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार तसेच बागलाण तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गणांच्या संभाव्य उमेदवारांची यादी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे भेट घेऊन देण्यात आली.

बागलाण तालुक्यात व सटाणा शहरात २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन व जनाधार असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत महायुती झाल्यास योग्य सन्मान मिळावा. अन्यथा सर्व जांगावर पक्षाकडे उमेदवार असून निवडुन येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारास पक्ष संधी देईल, तसेच सर्व जाती धर्माला न्याय दिला जाईल, याविषयी चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, खेमराज कोर,फहिम शेख, संदीप वाघ, संदीप भामरे, गायत्री कापडणीस, सुरेखा बच्छाव, दिंगबर सोनवणे, नंदराज देवरे, हेमंत मगर, रणधीर मोरे, अशोक भामरे, दिलीप खैरनार, हर्षद मगर, तुषार वाघ, भारत खैरनार, दादाजी खैरनार आदी उपस्थित होते.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित स्वरूपात लढविणार असल्याचे खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी सांगितले. यासंदर्भात सटाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बागलाण तालुक्यातील नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुकांसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये जागांबाबत तडजोड करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. निवडून येण्याची क्षमता असलेल्या प्रामुख्याने नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नगर परिषदेसाठी शहरातील १२ प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडे असलेल्या इच्छुकांबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट, मनसे आदी पदाधिकाऱ्यांच्या सुकाणू समितीच्या माध्यमातून उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार असल्याचे खासदार. डॉ. बच्छाव यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल पाटील, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, ठाकरे गटाचे नेते लालचंद सोनवणे, मनसेचे नेते पंकज सोनवणे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.