धुळे – सुनावणीसाठी न्यायालयात आणत असताना संशयिताने सिगारेट ओढली. परंतु, त्याची शिक्षा पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेल्या तीन पोलीस अंमलदारांना मिळाली. संशयिताच्या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याने तिघांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले.
राहुल जगताप, वसीम शेख आणि महेंद्र जाधव अशी निलंबित झालेल्या तीन पोलीस अंमलदारांची नावे आहेत. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसवितानाच पोलीस अधीक्षकांनी अलीकडे त्यांच्या अधीपत्याखालील यंत्रणेवरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अमली पदार्थ प्रतिबंध कायद्याखाली अकबर जलेला उर्फ अकबरअली कैसरअली शाह याच्याविरुद्ध शहरातील चाळीसगांवरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो सध्या जिल्हा कारागृहात आहे. न्यायालयीन कामकाजासाठी त्याला मंगळवारी दुपारी नेण्यात येणार होते. त्याच्या देखरेखीसाठी पोलीस मुख्यालयातील राहुल जगताप, वसीम शेख आणि महेंद्र जाधव यांची नेमणूक करण्यात आली होती. तीन पोलीस बरोबर असतानाही अकबरने सिगारेट ओढली.
अकबर हा सिगारेट ओढत असतानाचे छायाचित्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. आणि चौकशीची सूत्रे हलली. अकबर हा संशयित म्हणून पोलिसांच्या ताब्यात असतांना त्याला सिगारेट ओढण्याची बेकायदेशीरपणे मुभा कोणी दिली, असा प्रश्न निर्माण झाला. अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती घेतल्यावर अकबरच्या सिगारेट ओढण्याकडे तिन्ही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. संशयिताने पोलिसांच्या ताब्यात असताना सिगरेट ओढणे, या कृत्याचे छायाचित्र प्रसारित होणे ,हे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचे लक्षण असून यामुळेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तीनही पोलीस अंमलदारांचे निलंबन केले. या पोलिसांची विभागीय चौकशीही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
वेगवेगळ्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले जाते. यावेळी काही संशयितांना त्यांच्या दैनंदिन कृत्यांना शक्य तेवढी मुभा देण्यात येते, असे आरोप अधूनधून सुरु असतात. सराईत गुन्हेगारांच्या बाबतीत मात्र पोलिसांनी कठोर भूमिका ठेवली आहे. नियम-अटी शिथिल करण्याचेही धाडस सहसा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचे होत नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.