धुळे – कोणत्याही कामासाठी पैसे घेण्याचा रोग आता वरिष्ठ पातळीवरुन तळागाळात पोहचला आहे. त्याचेच उदाहरण धुळे जिल्ह्यात दिसून आले. मासिक पगारासाठी हजेरी लावून घेण्यासाठी धुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारतांना महापालिकेच्या मुकादमास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर त्यांचा मासिक पगार काढण्यासाठी हजेरीपत्रक मुकादमकडे पाठवण्यात येते. आणि मुकादम हे हजेरी पत्रक स्वच्छता निरीक्षकांकडे पाठवितो. या प्रक्रियेनंतर संबंधित कामगाराचा पगार दिला जातो. अशीच प्रशासकीय प्रक्रिया आरोग्य विभागात मुकादम असलेल्या रवींद्र धुमाळ (५०, रा. भटाईमाता रिक्षा स्टॉपजवळ, मोहाडी उपनगर, धुळे) याच्याकडून अपेक्षित होती.
ऑगस्ट २०२५ पर्यंतचा पगार मिळाल्यानंतर धुमाळने पुढील हजेरी लावण्यासाठी एका सफाई कर्मचाऱ्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. इतके पैसे देणे शक्य नसल्याने सफाई कर्मचाऱ्याने पगारासाठी तडजोड करण्याची विनंत केली. त्यानंतर सात हजार रुपये स्वीकारण्याचे मुकादम रवींद्र धुमाळाने मान्य केले.
परंतु, आपण केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसे मिळणे आवश्यक असताना मुकादमाने त्यासाठी पैसे मागणे सफाई कामगाराला आवडले नाही. त्याने त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एकंदरीत प्रकाराविषयी तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धुळे शहरात सापळा रचला. आणि संशयित रवींद्र धुमाळ यास सफाई कामगाराकडून सात हजार रुपये स्वीकारताच रंगेहात पकडले. या प्रकरणी रवींद्र धुमाळ विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धुमाळ यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रशांत बागूल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांचा समावेश होता. कोणत्याही शासकीय कामासाठी एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती पैशांची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.