धुळे: खासदार, आमदारांनी पत्र दिल्यानंतरही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नवीन वीजवाहक तार टाकण्याचे काम न केल्याने आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तीव्र आंदोलन केले. यावेळी एका अभियंत्यास काळे फासण्याचा प्रयत्न झाला.
भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत चितळकर यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील स्वामी नारायण कॉलनीत घरासमोरील विजेची उघडी झालेली धोकादायक तार काढून नवीन तार टाकावी, अशी मागणी अर्जाव्दारे केली होती. दीर्घकाळ प्रयत्न करूनही काम झाले नाही. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून विनंतीही केली.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनुप अग्रवाल यांनीदेखील चितळकर यांचे काम करून देण्याची विनंती केली. तरीही पाच महिने उलटूनही काम न झाल्यामुळे शुक्रवारी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयात तीव्र आंदोलन केले. याप्रसंगी कार्यालयातील धुळे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांना आंदोलकांनी जाब विचारला.
आठ दिवसांत सर्व कामे मार्गी न लागल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलन सुरू असतानाच कल्याणी अंपळकर यांनी अभियंता भामरे यांच्या अंगावर शाही फेकून काळे फासण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा प्रयत्न फसला.
या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, कामगार आघाडीचे भागवत चितळकर, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, पंकज धात्रक, संगीता राजपूत आदी झाले होते.