धुळे – वाढीव घरपट्टीसह अस्वच्छता, दूषित पाणी या समस्यांविरोधात राष्ट्रवादीने (अजित पवार) महानगर पालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी हातगाडीवर प्रतिकात्मकरित्या कुंभकर्णाचा सजीव देखावाही आंदोलनावेळी करण्यात आला होता.
यावेळी मनपा उपायुक्त स्वालिया मालगावे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पक्षाने भूमिका मांडली. पालिकेने घरपट्टीत सहाशे पट वाढ केली आहे. ज्यांना ६०० रुपये घरपट्टी होती, त्यांना सहा हजार रुपये आणि ज्यांना सहा हजार रुपये होती, त्यांना ६० हजार रुपये घरपट्टी येत आहे. नळांना दूषित पाणी येत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे नागरिक बेजार झाले आहेत. पिण्यासाठी स्वच्छ आणि नियमित पाणी मिळावे, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.
वाढीव घरपट्टी तत्काळ कमी करावी, शहराचे विभाग पाडून त्यातील सुविधांनुसार मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी. त्वरीत नालेसफाई करावी, साथीच्या आजारापासून नागरिकांची सुटका करावी. काही भागात होणारा दूषित पाणी पुरवठा बंद करावा, पथदिव्यांची संख्या वाढवावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनात सुनील नेरकर, प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर, सचिन दहिते, सारांश भावसार, गणेश जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरात घरपट्टी वाढवली आहे. घाणीचे साम्राज्य आहे, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगर पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. त्यांना जागे करण्यासाठी वेळोवेळी अशी आंदोलने केली जातील. – सुनील नेरकर (राष्ट्रवादी -अजित पवार गट, धुळे)