जळगाव – जिल्ह्यात सध्या महायुतीचा दबदबा असला तरी राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसची म्हणावी तशी ताकद नाही. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी दुसऱ्या पक्षातून येणार्या लोकांच्या स्वागताची भूमिका घेतली असताना, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मात्र त्यास विरोध होत आहे. जळगावात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या प्रवेशापूर्वीही थेट पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी कुरबुर केल्याचे दिसून आले.
अजित पवार गटातर्फे जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. तत्पूर्वी, पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगावमधील पक्षाच्या जिल्हा कार्यालयास भेट दिली. त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणी वाढवावी, गावागावांत पक्षाची विचारधारा पोहोचवावी आणि युवकांना मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची संधी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार शरद पाटील, अजित पवार गटाचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील आदी बरेच पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी अमुक तमुक व्यक्तीला पक्षात घेऊ नका. त्यांच्यावर इतके गुन्हे दाखल आहेत, अशा आशयाची निवेदने देण्यात आली.
प्रतिभा शिंदे यांच्याविषयी देखील कुरबुर करण्यात आली होती. त्याविषयी बोलताना, उपमुख्यमंत्री पवार यांनी उलटत्यांच्याकडे तक्रारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे जाहीरपणे कान टोचले. पक्षात दोन माणसे कमी असली तरी चालतील; परंतु, राहिलेली चार माणसे जीवाला जीव देणारी असावी. स्वतःची प्रतिमा पहिल्यांदा जपा. इतर लोक आपोआप तुमच्याकडे येतील, असे अजित पवार म्हणाले.
दादा, याला घेऊ नका त्याला घेऊ नका. त्याने आमचे असे केले. त्यांच्यावर इतके गुन्हे दाखल आहेत, अशा तक्रारी करत बसू नका. तरच आपण पुढे जाऊ, असे बोलून अजित पवार यांनी तक्रारी करणाऱ्यांना बैठकीत चांगलेच सुनावले. त्यामुळे संबंधितांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. पक्षाच्या मेळाव्यात नंतर प्रतिभा शिंदे यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला.
शिंदे यांच्या कामाची धडाडी आपण पाहिली आहे आणि त्यांच्या सारख्यांची पक्षाला गरज आहे. त्यामुळे आपणच त्यांना अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह करत होतो, असे अजित पवार यांनी मेळाव्याच्या ठिकाणी बोलताना नमूद केले. शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशावेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असाच खोडा घातला होता. ज्यामुळे देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश तब्बल चार महिने बारगळला होता.