जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात वाघले कोंगानगर येथे एका शेतात पावसामुळे झाडाखाली उभ्या राहिलेल्या पाच जणांवर रविवारी दुपारी वीज कोसळली. त्यात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांसह एका तरूणाचा समावेश आहे. इतर दोन जण जखमी झाले.

वाघले कोंगानगर शिवारातील एका शेतात लखन पवार (१४), दशरथ पवार (२४), दिलीप पवार (३५), उदल पवार (६५, सर्व, रा. कोंगानगर, चाळीसगाव) आणि समाधान राठोड (नऊ वर्षे, रा.जेहूर,.कन्नड) हे सर्वजण कपाशी लागवडीचे काम करत होते. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वजण हातचे काम सोडून बांधावरील झाडाखाली थांबले. त्याचवेळी नेमकी वीज कोसळल्याने लखन पवार, दशरथ पवार आणि समाधान राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दिलीप पवार व उदल पवार गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात आठवडाभरातच वादळी पावसामुळे एकूण पाच जणांचे बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.