जळगाव – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढला असल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने स्लरी फिल्टर युनिटसाठी अनुदान देण्याची योजना आणली आहे. ज्या माध्यमातून किमतीच्या पन्नास टक्के किंवा प्रती उपकरण जास्तीत जास्त १८ हजार अनुदान दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
स्लरी कोणत्याही पिकांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण ती पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि वाढीसाठी पोषक घटक पुरवते. ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते. पिकांचे पुरेपुर पोषण होते, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि पिकांची वाढ जोमदार होते. विशेषतः स्लरीमुळे रासायनिक खते पिकास लवकर लागू होतात. खतांची कार्यक्षमता वाढते. पांढऱ्या मुळींची भरपूर वाढ होते. स्लरी मुख्य अन्नद्रव्यातील स्फुरदचे स्थिरीकरण कमी करण्यास मदत करते तसेच नत्राचे बाष्पीभवन होऊ देत नाही. या अशा बऱ्याच कारणांमुळे शेतकरी सेंद्रीय शेती करत असताना स्लरीचा वापर करताना दिसून येतात. मात्र, बऱ्याच वेळा स्लरी थेट ठिबकवाटे सोडता येत नाही. स्लरीमधील कचरा ठिबकमध्ये अडकल्याने अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने अनुदानित स्लरी फिल्टर युनिट योजनेला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.
सेंद्रिय शेतीत शेण, गोमूत्र आदी घटकांपासून तयार केलेले जीवामृत वापरण्यासाठी स्लरी फिल्टर युनिट एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. जळगाव जिल्ह्यात त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना राबवण्यात येत आहे. या उपकरणामुळे स्लरीचा वापर थेट ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे करणे सोपे होईल. तसेच मजुरी आणि रासायनिक खतांवरील खर्चातही मोठी बचत होऊ शकणार आहे. सेंद्रिय शेतीत वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांच्या शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर स्लरी फिल्टर युनिट हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या यंत्राद्वारे १०० टक्के कचरा-मुक्त स्लरी तयार केली जाईल, जी थेट ठिबक-तुषार सिंचन प्रणालीवाटे शेतात पिकांसाठी वापरता येईल. फिल्टरद्वारे तयार झालेली स्वच्छ स्लरी पिकांना सहज उपलब्ध होईल. ज्यामुळे जीवामृतासारखी सेंद्रिय खते प्रभावीपणे पिकांपर्यंत पोहोचू शकतील. परिणामी, मातीची सुपीकता वाढेल. रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल.
स्लरी फिल्टरसाठी किती अनुदान ?
शेतकऱ्यांना ५०० लिटर क्षमतेच्या स्लरी फिल्टर युनिटसाठी ५० टक्के मर्यादेत जास्तीतजास्त १० हजार ७५० रूपयांचे अनुदान मिळू शकणार आहे. या शिवाय, ५०१ ते ११०० लिटर क्षमतेच्या स्लरी फिल्टर युनिटसाठी १४ हजार रूपये आणि १३०० ते १५०० लिटर क्षमतेच्या स्लरी फिल्टर युनिटसाठी जास्तीतजास्त १८ हजार रूपयांचे अनुदान मिळू शकणार आहे.
अनुदानासाठी अर्ज कुठे करावा ?
स्लरी फिल्टर युनिट योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. शेतीचा सातबारा उतारा, आठ अ, गोठ्यात जनावरे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, ॲग्रीस्टॅक नोंदणी पत्र, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स आणि जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. अर्ज करण्याची मुदत पाच सप्टेंबरपर्यंत आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली.