जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने-चांदीच्या दरात दरात मोठी दरवाढ नोंदवली गेली. दोन्ही धातुंचे भाव अचानक गगनाला भिडल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे कठीण होत चालले असून, वाढत्या किमतींमुळे चिंता निर्माण झाली आहे. भारतीय लोक लग्नासारख्या शुभ कार्यक्रमाप्रसंगी अनेकदा सोने-चांदी खरेदी करतात. भारतीय संस्कृतीत दोन्ही धातू खरेदी करणे शुभ मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार होऊ शकतात. लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे, जो सोन्याला पुन्हा आधार देईल. परिणामी, येत्या काळात सोन्याची किंमत पुन्हा एकदा १.३० लाखांपर्यंत तसेच चांदीची किंमत १.७० लाखांपर्यंत पोहोचू शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीतील वाढ ही फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने होत आहे. एका अहवालानुसार अमेरिकन मध्यवर्ती बँक डिसेंबरमध्ये व्याजदरात कपात करू शकते. या शिवाय, स्थिर डॉलर आणि वाढत्या अमेरिकन बाँड उत्पन्नामुळे देखील सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. या वर्षी सोन्याच्या किमती वाढण्यामागे व्याजदरात कपात हे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेतील नवीन आकडेवारीनुसार रोजगार बाजारपेठ आशादायक असल्याचे दिसून येते. दरम्यान, ग्राहकांची भावना कमकुवत आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जळगाव शहरात २७ ऑक्टोबरला शहरात सोन्याचे दर एक लाख २६ हजार १७५ रूपयांपर्यंत स्थिरावले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू राहिले. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ९०९ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर पुन्हा दर वाढल्याने सोमवारी सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २६ हजार २७८ रूपयांपर्यंत पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच आणखी १७५१ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याच्या दराने एक लाख २८ हजार ०२९ रूपयांपर्यंत मजल मारली.
चांदीत ५१५० रूपयांनी वाढ
शहरात गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावले होते. सोमवारी २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा तब्बल ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ६१ हजार ७१० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
