जळगाव – राज्यात तणनाशक सहनशील कपाशीचे (एचटीबीटी) बियाणे विकण्यास आणि लागवडीस पूर्णतः बंदी असतानाही जिल्ह्यात गुजरातमधून हे बियाणे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आणले गेले. अवैध एचटीबीटीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याने साहजिकच बीटी बियाण्याची सुमारे १० लाख पाकिटे कृषी केंद्रांवर विक्रीअभावी पडून आहेत. संबंधित सर्व विक्रेत्यांना त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे पाच लाख ५० हजार हेक्टर इतके आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडे लागवडीसाठी आवश्यक २५ लाख २५ हजार बीटी बियाण्याच्या पाकिटांची मागणी यंदा नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात, जूनअखेर महाबीज आणि इतर खासगी बियाणे कंपन्यांकडून जिल्ह्यास २३ लाख १३ हजार ५३८ बीटी बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा झाला. पुरवठा झालेल्या पाकिटांपैकी १८ लाख २२ हजार ८४० पाकिटांची विक्री झाल्याचा आणि चार लाख ९० हजार ६९८ पाकिटे शिल्लक राहिल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यंदा शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल वाढल्याने कपाशीचे क्षेत्र साधारण २५ टक्क्यांनी घटले. त्यात दुसऱ्या राज्यातून आलेल्या अवैध एचटीबीटी बियाण्याची विक्रीही वाढली. दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून कृषी केंद्रांवरील बीटी बियाणे विक्री घटल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, अवैध एचटीबीटी बियाणे विक्रीवर पूर्णतः प्रतिबंध आणण्यात अपयशी ठरलेला कृषी विभाग खोटी आकडेवारी दर्शवित असल्याचा आरोप कृषी केंद्र चालकांच्या संघटनेने केला आहे. जळगाव जिल्ह्यास दरवर्षीच्या खरिपात बीटी बियाण्याच्या विविध वाणांची सुमारे २० लाख पाकिटे लागतात. त्यादृष्टीने यंदाही कृषी केंद्र चालकांनी बियाणे मागवून ठेवले होते. मात्र, जून संपला तरी निम्मीच पाकिटे विकली गेली. शिल्लक राहिलेली बियाण्याची पाकिटे कंपन्यांनी परत न घेतल्यास विक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असे बियाणे विक्रेता संघटनेने नमूद केले आहे.
कपाशीला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा यंदा मका लागवडीवर भर आहे. परिणामी, कपाशीचे क्षेत्र जवळपास २५ टक्क्यांनी घटले असून, बीटी बियाणे विक्री कमी झाली आहे. एचटीबीटी बियाणे विक्री वाढल्यामुळेही वैध बीटी बियाण्यांची विक्री प्रभावित झाली. – पद्मनाभ म्हस्के (कृषी विकास अधिकारी, जळगाव)