जळगाव : जिल्ह्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह चौघांच्या विरोधात सुमारे पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेत उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावाने सुमारे पाच कोटी ३३ लाख रूपयांचे औद्योगिक कर्ज काही वर्षांपूर्वी घेण्यात आले होते. ठरलेल्या मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते कालांतराने एनपीए म्हणून घोषित करण्यात आले.

बँकेने कंपनीला परतफेडीसाठी अतिरिक्त मुदत दिली; परंतु, कर्जाची रक्कम वेळेवर भरली न गेल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली. कंपनीचे संचालक माजी खासदार उन्मेश पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली यंत्र सामग्री संगनमताने विकल्याचे उघड झाले. या व्यवहारामुळे देवगिरी बँकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानुसार माजी खासदार पाटील यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला गेला आहे. सध्या पोलिसांकडून यंत्र सामग्रीच्या विक्रीसाठी वापरलेली कागदपत्रे, विक्रीतून आलेली रक्कम आणि बँकेची दिशाभूल करण्यामागील संगनमत, याची सविस्तर चौकशी केली जात आहे.

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्यात अलीकडेच बीएचआर पतसंस्थेच्या भूखंड प्रकरणावरून तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्याचवेळी मंत्री महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावर स्टेट बँकेसह आणखी एका बँकेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता.

मंत्री महाजन यांच्या आरोपानंतर केवळ तीन दिवसांतच माजी खासदार पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आधीच जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही बलाढ्य पक्षांना तोंड देऊ शकणाऱ्या नेत्यांत माजी खासदार पाटील यांची गणना होते.

परंतु, निवडणुका तोंडावर असतानाच पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी आता वाढल्याचे बोलले जात आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे गटासह शरद पवार गट आणि काँग्रेसकडून आता परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.