जळगाव – जिल्ह्यात सगळीकडे स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना, जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथे महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शुक्रवारी सकाळी महापुरूषाच्या पुतळ्याची किरकोळ तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याची माहिती मिळताच शेंदुर्णी येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. भर पावसात शेकडो नागरिकांनी पोलीस चौकीसमोर जमून दोषी व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. ही केवळ पुतळ्याची विटंबना नाही तर आमच्या श्रद्धेची विटंबना आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने पुतळ्याची डागडुजी करण्याचे तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

दरम्यान, पुतळ्याच्या शेजारी असलेल्या एका दुकानाच्या बाहेर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे छायाचित्रण तपासल्यावर पोलिसांना एक संशयित तिथे रात्रीच्या वेळी घुटमळताना दिसून आला. त्यास चौकशीसाठी लगेच ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव भागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण आव्हाड, प्रांताधिकारी विनय गोसावी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, कल्याणी वर्मा आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त झालेल्या जमावास शांत करून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, शेंदुर्णी येथील तणावाची स्थिती आता निवळली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना होण्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही पुरावा गोळा करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी केले.

याशिवाय, नागरिकांनी समाज माध्यमांवर खोट्या अफवा पसरवणाऱ्या पोस्ट न टाकण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. अफवा पसरविल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या आवाहनावरून शहरांसह गावांमधील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने अलीकडे सुरक्षेत भर पडली आहे. कायदा सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत होत आहे. मात्र, महापुरूषांच्या पुतळ्यांजवळ अजुनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.