नाशिक : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक मध्यची जागा शिवसेनेला (उद्धव ठाकरे) गेल्याने काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीतील सांगली प्रारुप राबविण्याचा आग्रह पक्षाचे नाशिक प्रभारी परेश धनानी यांच्यासमोर धरण्यात आला. एकतर ही जागा काँग्रेसकडे घ्यावी, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, असा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. पक्ष निरीक्षकांनी सबुरीचा सल्ला देत महायुतीला सत्ता स्थापन करण्यापासून रोखणे हे आपले पहिले उद्दिष्टे असल्याची जाणीव करून दिली.

नाशिक मध्यसह शहरातील एकही जागा काँग्रेसच्या वाट्याला येत नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अस्वस्थता विविध माध्यमातून व्यक्त होत आहे. नाशिक मध्यमधून अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी आधीच जाहीर केले आहे. काहींनी पक्ष कार्यालयास टाळे ठोकून नेत्यांचा निषेध केला होता. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर, कृष्णा लॉन्स येथे आयोजित काँग्रेसचा निर्धार मेळावा वादळी ठरला. प्रभारी परेश धनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड, राहुल दिवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक मध्यची जागा लढण्याचा निर्धार केला. मेळाव्यास डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे हे इच्छुक उपस्थित नव्हते. नाशिक मध्य ही पक्षाची पारंपरिक जागा आहे. ती मित्रपक्षांना दिल्यास महापालिका निवडणुकीवर परिणाम होईल. कुठल्याही परिस्थितीत ही जागा काँग्रेसकडे घ्यावी अन्यथा मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव मांडला गेला. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून असाच पेच निर्माण झाला होता. तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊन काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तोच प्रयोग या ठिकाणी करण्याचा आग्रह धरला गेला आहे.

हेही वाचा…जमिनी लाटण्याचा उद्योग कोणी केला, छगन भुजबळ यांचा सुहास कांदेंना प्रश्न

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन

काँग्रेसचे नाशिक प्रभारी परेश धनानी यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे हे आपले पहिले उद्दिष्ट्ये असल्याचे स्पष्ट केले. सत्तेचा गैरवापर करून भाजपने राज्यातील दोन पक्ष फोडले. महागाई, बेरोजगारीचे मुद्दे प्रचारात मांडणे महत्वाचे आहे. पक्ष फोडणाऱ्यांना धडा शिकविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. काँग्रेसच्या हक्काच्या जागेबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना राज्य व देशातील नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल, असे धनानी यांनी नमूद केले.