नंदुरबार – आम्ही लाडक्या बहिणींमुळेच निवडून आलो. सख्खा भाऊ एकदाच पैसे देतो. परंतु, शिंदेभाऊ दर महिन्याला मदत करतो. म्हणून त्यांच्या पाठीशी महिला उभ्या राहिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटीमध्ये अर्ध्या भाड्यात प्रवासाची सवलत दिली. लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे यांनी सक्षम केल्यानेच आज नवरे बायकांकडे पैसे मागतात अशी परिस्थिती आहे, असे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिंदे गटाच्या वतीने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम शहरातील माळी मंगल कार्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पाच हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. तळोदा शहरात शिवसेनेचा आमदार, खासदार नसतांनाही मेळाव्याला लाडक्या बहिनींची झालेली गर्दी ही शिवसेनेच्या या ठिकाणच्या कामाची पावती असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसैनिकांनो, तुम्ही टेंशन घेऊ नका. या महिलांची झालेली गर्दी तुम्हाला नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुकीत तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहील. जगात ज्याला बहीण, मुलगी नाही, तो कमनशिबी आहे. मी सहा महिन्यांचा असतांना माझी आई वारली. माझ्या काकूने मला मोठे केले. मात्र आज तुमच्या उपस्थितीत प्रत्येक महिलांमध्ये माझी आई, बहीण दिसत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांचे डोळे काहीसे पाणावले.
या मेळाव्याच्या व्यासपीठावरुन आमदार आमश्या पाडवी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोद्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे भाषणातून सांगितले. यानंतर पत्रकांराशी संवाद साधतांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेतला. तसेच खासदार संजय राऊतांनाही टोला हाणला. राऊत कागद घेवून रंगवणारा माणूस. त्याला आमच्यामुळे खासदारकी मिळाली, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी काय बोलावे, हा त्यांचा विषय आहे. महायुतीमध्ये तीन भाऊ आहेत. त्यामुळे थोड्या गोष्टींवर त्यांच्यात कुरघोड्या होणारच. मात्र एकनाथ शिंदे यांनी काय टिकवले आणि काय नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांविषयी असे बोलण्याऐवजी संयमाने वागावे, असा सल्लाही शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी गणेश नाईक यांना दिला.