नाशिक – पायी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र, सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून खेचून नेण्याचे प्रकार कायमच घडत असताना आता पादचारी महिलेच्या चेहऱ्यावर फवारा मारुन महिलेने दागिने पळवून नेले. संत सावतामाळी रस्त्यावर भरदिवसा हा प्रकार घडला. चोरट्या महिलेने अवलंबलेल्या तंत्राने पादचारी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

उपरोक्त घटनेबाबत इंदिरानगरच्या गार्डन व्ह्यू अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मानसी पाठक यांनी तक्रार दिली. मुलाला शिकवणीला सोडण्यासाठी त्या सकाळी गेल्या होत्या. संत सावता माळी रस्त्यावरील मोकळ्या मैदानातून त्या घरी परतत असताना ही घटना घडली. समोरून पायी आलेल्या महिलेने काही समजण्याच्या आत जवळ येताच त्यांच्या चेहऱ्यावर फवारा मारला. त्यामुळे पाठक यांच्या डोळ्यात आग होऊ लागली. त्या जमिनीवर बसल्या. त्यावेळी संशयित महिलेने त्यांच्या हातातील अंगठी, कानातली असा सुमारे २२ हजार ३०० रुपयांचा ऐवज काढून पलायन केले.

हेही वाचा – “कागदपत्रे बनावट निघाल्यास एसीबी कार्यालयात गळफास घेणार”, ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा इशारा

हेही वाचा – “मयत सलीम कुत्ताच्या नावाने सत्ताधाऱ्यांचे राजकारण”, ठाकरे गटाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार घडला. थोडेसे सावरल्यानंतर पाठक यांना दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज सोनवणे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांकडून पादचारी महिलांचे दागिने खेचून नेण्याचे आजवर अगणिक प्रकार घडले आहेत. अशा घटनांमध्ये कमी वर्दळीचे रस्ते वा परिसरात चोरटे महिलांना गाठतात, असे दिसून येते. या घटनाक्रमात या घटनेमुळे नव्याने भर पडली आहे. एखाद्या चोरट्या महिलेकडून डोळ्यांना त्रास होईल, असा फवारा मारून महिलेचे दागिने लंपास करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.