नाशिक – सरकारने आश्वासन देऊनही प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या काम बंद आंदोलनांतर्गत सोमवारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी निदर्शने केली. जिल्ह्यातील ५०० कृषी सहायक काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कृषिमंत्री माणिक कोकाटे ज्या दिवशी शहरात खरीपपूर्व हंगामाच्या तयारीचा आढावा घेणार होते, तोच दिवस कृषी सहायकांनी आंदोलनासाठी निवडला. प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेतर्फे १५ मेपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. सोमवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन झाले. २१ मे रोजी विभागीय कृषी संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. काम बंद आंदोलन सुरू असले तरी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात पंचनाम्यात कृषी सहायक सहभागी होत असल्याचे राज्य संघटनेचे सहसरचिटणीस जयकिर्तीमान पाटील यांनी सांगितले. कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी असे करण्याची मागणी १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. या बदलाने शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
एन.डी. पटेल रस्त्यावरील कृषी विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन कृषी सहायक संघटनेतर्फे जिल्हा कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांना देण्यात आले. कृषीसेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती, कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करणे, कृषी सहायकांना लॅपटॉप, मदतनीस देणे, वाहतूक भाड्याची तरतूद, कृषी विभागाच्या आकृतीबंधास तत्काळ मंजुरी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत..नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करणे व त्यानंतर करावयाच्या कामाबाबत महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्याचा संबंधितांचा आग्रह आहे.
कारवाईचा इशारा
खरीप हंगामात शेतकरी आणि सरकारला वेठीस धरण्याचे काम केल्यास कारवाईचा इशारा कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी दिला आहे. वळीवाच्या पावसात राज्यात पिकांचे नुकसान होत आहे. कृषी सहायकांच्या मागण्या आधीच मान्य केलेल्या आहेत. निर्णय प्रत्यक्षात येण्यास काही कालावधी लागतो. तरीदेखील कोणी संप पुकारत असेल तर कारवाई करावी, असे निर्देश दिल्याचे कोकाटे यांनी सांगितले.