नाशिक : निफाड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना होणारा धान्य पुरवठा विस्कळीत झाला असून धान्य वितरणास तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. निफाडसह तालुक्यातील जळगाव, काथरगाव, कुरुडगाव, सुंदरपूर, रसलपूर या गावांमध्ये राहणारी सुमारे पाच हजार कुटुंबे ही निफाड शहरातील दोन स्वस्त धान्य विक्री केंद्रांशी जोडलेली आहेत. शासनाच्या पुरवठा विभागाकडील संगणक प्रणालीत बिघाड झाल्याने हजारो शिधापत्रिका धारकांना जुलै महिन्यातील धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जुलै महिना संपण्यासाठी जेमतेम तीन-चार दिवसांचा कालाववधी शिल्लक असून नागरिकांना स्वस्त धान्य व इतर वस्तूंचा पुरवठा होऊ शकलेला नाही. याबाबत निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे तसेच संबंधित पुरवठादार यांनी, सार्वजनिक पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन प्रक्रिया ही राज्य पुरवठा विभागाच्या संगणक प्रणालीतील सर्व्हर बिघाडामुळे २० जुलैपासून बंद पडली असल्याचे सांगण्यात आले. स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेण्यासाठी शिधापत्रिका धारकाचा अंगठ्याचा ठसा हा ठसायंत्रात (थम्ब स्कॅनर ) उमटला पाहिजे. ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे पैसे मिळाल्याची पावती निघू शकत नाही, पर्यायाने शिधापत्रिकाधारकांना शिधा मिळू शकत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वाटप करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: नाशिक: सापडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या स्वाधीन, महिला सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिधापत्रिका धारकांकडून शासन केवायसी करण्यासाठी वेळोवेळी आधारकार्ड, फोटो, बोटांचे ठसे बायोमेट्रिक ओळख अशा विविध गोष्टींची पडताळणी करत असते. ही मोहीम सध्या सुरू आहे. परंतु, या मोहिमेलादेखील सर्व्हर बंद पडण्याचा फटका बसला आहे. सर्वसामान्यांना दैनंदिन सर्व कामे सोडून तासंतास स्वस्त धान्य दुकानांपुढे रांग लावून उभे राहावे लागते.