धुळे – नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना धुळ्यातील एका कार्यक्रमात आपणच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचा दावा गिरीश महाजन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला महायुतीतील वाद खरोखरच मिटला आहे काय, असाही प्रश्न उपस्थित उपस्थित झाला आहे. विरोधकांनी कितीही थरावर थर लावले, तरी गेल्यावेळपेक्षा यावेळी होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हीच एकहाती ताब्यात घेऊ, असा दावाही त्यांनी केल्याने विरोधकांनाही धडकी भरली आहे.

येथील जय श्री कृष्ण सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवावेळी मंडळाचे अध्यक्ष भिकनअप्पा वराडे यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे कार्यक्रम झाले. मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेता ओम भूतकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. याशिवाय जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आमदार अनुप अग्रवाल, राघवेंद्र भदाणे, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दही हंडी म्हणून या दहीहंडीचे कौतुक केले.

खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आपण प्रमोद महाजन नाहीत. आपण जामनेरचे गिरीश महाजन आहात, असा टोला महाजन यांना हाणला होता. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. प्रमोद महाजन यांच्याशी आपली बरोबरी होऊ शकत नाही. संजय राऊत यांच्यासारख्या आपण तोंडाने वाफा सोडत नाही. उत्तर महाराष्ट्रात मी आहे. राऊत यांनीही उत्तर महाराष्ट्रात यावे आणि एखादीतरी महानगरपालिका ताब्यात घेऊन दाखवावी, असे आव्हान महाजन यांनी संजय राऊत यांना दिले.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार, असा दावाही त्यांनी धुळ्यातील कार्यक्रमात केला. दरवेळी निवडणूक आली की मुंबई वेगळी होणार आणि मुंबई गुजरातच्या ताब्यात जाणार, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देश पुढे जातो आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेतृत्व असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून कामे सुरु आहेत.गेल्या वेळी आम्ही सर्व महापालिका एक हाती ताब्यात घेतल्या होत्या. गेल्या वेळेपेक्षा यावेळी आमचे अधिक नगरसेवक निवडून येतील.

उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आम्ही एकहाती ताब्यात घेऊ. भाजप आणि महायुतीची तयारी अगदी जोरात सुरू आहे. विरोधकांचे कितीही थर लागले तरी थरावर थर लावून ही दहीहंडी आम्हीच फोडणार. आगामी निवडणुकांचे निकाल कसे लागतील हे बघा. महाराष्ट्राचे चित्र कसे असेल हेही आपणास दिसणार आहे. आपण कामाच्या जोरावर आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या तसेच जनाधारावर बोलतो. मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे यासह ज्या-ज्या ठिकाणी महापालिका असतील,त्या ठिकाणचा एकदा निकाल येऊ द्या, म्हणजे तुम्हाला समजेल ,की लोकांचा विश्वास कोणाच्या नेतृत्वावर आहे. या सर्व संस्था आम्हीच ताब्यात घेऊ, असा दावा मंत्री महाजन यांनी केला.