नाशिक – जिल्ह्यातील सारूळ शिवारात जागेच्या वादातून घरकूल योजनेतील बांधकामास विरोध करुन मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपवासी झालेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंबळे यांच्यासह आठ ते १० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीविरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भाऊसाहेब तांबडे (४४, सारूळ) यांनी तक्रार दिली. सहा जुलै रोजी दुपारी सारूळ शिवारात ही घटना घडली होती. तांबडे हे गट क्रमांक १८० मधील वडिलोपार्जित सामाईक जागेत मंजूर घरकूल योजनेतील घराच्या पायाभरणीचे काम करीत होते. त्यावेळी बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक शिवाजी चुंबळे तिथे आले. ही जागा मी तुमच्या चुलतबहिणीकडून विकत घेतली असून तसे साठेखत केल्याचा दावा त्यांनी केला. घराचे काम बंद करण्यास सांगितले.
आपण जागा खरेदीची कागदपत्रे मागितली असता चुंबळे यांच्याबरोबर असणाऱ्यांनी मारहाण केल्याचे तांबडे यांनी म्हटले आहे. यावेळी तक्रारदाराचे कुटुंबिय वाद सोडविण्यासाठी आले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शिवाजी चुंबळे (गौळाणे, सध्या रा.लेखानगर, सिडको), गणेश सूर्यवंशी (गौळाणे), ज्ञानेश्वर चौधरी (सारूळ) यांच्यासह आठ ते १० जणांविरुद्ध वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवाजी चुंबळे हे नाशिक बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी समितीच्या काही संचालकांना आपल्याकडे वळवून बाजार समितीतील राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी खासदार देविदास पिंगळे यांची बाजार समितीतील सद्दी संपुष्टात आणली. बाजार समितीच्या सभापतीपदी चुंबळे यांच्या पत्नी कल्पना चुंबळे या बिनविरोध विजयी झाल्या. तेव्हा माजी खासदार पिंगळे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर फोडाफोडीच्या राजकारणाचे आरोप केले होते.