नाशिक : दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगल्याच्या प्रकरणात उपनगर परिसरातील समता नगरातील तिघांना पोलिसांनी अटक केली. नाशिक-पुणे मार्गावरील इच्छामणी लॉन्स भागातील मैदानावर ही कारवाई करण्यात आली. यातील एक सराईत गुन्हेगार आहे. संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या, ते बाळगण्याचे प्रयोजन काय, याची छाननी तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. शुभम जाधव (२३), सचिन सोनवणे (२४, दोघेही सोनवणे बाबा चौक, समतानगर आणि गणेश भालेराव उर्फ बॉबी (२४), सिध्दार्थ किराणा जवळ, समतानगर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
इच्छामणी लॉन्स लगतच्या मैदानावर एक जण गावठी बंदूक आणि काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील शिपाई जयंत शिंदे यांना मिळाली. त्यानंतर निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या निर्देशानुसार सहायक निरीक्षक चौधरी, शिपाई जयंत आणि अनिल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तपासात गणेश भालेराव या आणखी एका साथीदाराची माहिती मिळाली. पथकाने भालेरावच्या घराची झडती घेतली. त्याच्याकडून एक गावठी बंदूक, दोन जिवंत काडसे हस्तगत केली. उपनगर पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शुभम जाधव हा नोंदीतील गुन्हेगार आहे. संशयितांनी शस्त्रे कुठून मिळवले, त्याचे कुठे वितरण केले जाणार होते का, याची छाननी केली जाणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.
हेही वाचा… नाशिक शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे गटाचे ?
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांनी शहरातील गुंड प्रवृत्ती व दहशत पसवणाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्याचे पथक समतानगर झोपडपट्टी, टाकळी गाव, आम्रपाली झोपडपट्टी, रोकडोबा वाडी आणि फर्नांडिसवाडी भागात भागात विशेष मोहीम राबवून मद्यपी व टवाळखोरांविरोधात कारवाई करत आहे. समतानगर भागात पायी गस्त घातली जाते. यातून उपरोक्त खबर मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.