नाशिक : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिकमधून शिवसेनेचा खासदार निवडून आला असला तरी शिवसेनेतील फुटीनंतर बदलत्या राजकीय समीकरणात उद्धव ठाकरे गट आपले वर्चस्व कायम राखते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली ताकद दाखवून देतात याचीच अधिक उत्सुकता आहे. ठाकरे गटाने अलीकडेच नाशिकमध्ये अधिवेशन घेऊन नाशिक जिंकण्याचा निर्धार केल्याने शिंदे व ठाकरे गटात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
अनुसूचित जाती महासंघासह शेकाप, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा विभिन्न विचारधारांची आतापर्यंतच्या इतिहासात पाठराखण केलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर आगामी निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील कोणत्या घटक पक्षाला उमेदवारीची संधी मिळेल, याविषयी अद्याप अनिश्चितता असली तरी उमेदवारांच्या चर्चेचे पीक मात्र जोमात आहे. २०१४ आणि २०१९ या लागोपाठच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी विजय संपादन केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार गोडसे यांनी शिंदे यांना साथ दिली. तेच गोडसे पुन्हा एकदा आगामी निवडणुकीसाठी तयारीत आहेत. गोडसे यांनी मागील दोन निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयावेळी शिवसेना एकसंघ होती. गोडसे आता शिंदे गटात आहेत. नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून होत असलेल्या हालचाली गोडसे यांच्यासाठी त्रासदायक आहेत. भाजपकडून माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी उमेदवारी गृहित धरुन समर्थकांमार्फत समाजमाध्यमासह वेगवेगळ्या कार्यक्रमांतून प्रचार सुरु केला आहे. दिनकर पाटील यांचे बंधू माजी महापौर दशरथ पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांचा पक्ष मात्र कोणता, हे अनिश्चित आहे. भाजपकडून आमदार राहुल ढिकले यांच्या नावाचीही चर्चा आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास चांगलाच रंजक आहे. या मतदारसंघाने पहिल्या निवडणुकीत अनुसूचित जाती महासंघाच्या भाऊराव गायकवाड यांना साथ दिली होती. नाशिकशी तसा कोणताही संबंध नसताना जिल्ह्यास हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेड (एचएएल) या कारखान्याची देण देणारे काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव चव्हाण यांना १९६२ मध्ये लोकसभेवर पाठवले. काँग्रेसचे बी. आर. कवडे हे १९६७ आणि १९७१ या सलग दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले होते. त्यांचा हा विक्रम २०१४ पर्यंत अबाधित राहिला.
महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांकडून जागेवर दावा केला जात आहे. ठाकरे गटाने नाशिकमध्ये अलिकडेच घेतलेल्या अधिवेशनात उमेदवारी कोणाला मिळेल, याविषयी संकेत दिले नसले तरी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नावाचा उल्लेख संजय राऊत यांच्याकडून याआधी वारंवार करण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून गोकुळ पिंगळे यांचे नाव अग्रस्थानी आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होत असली तरी स्वत: ठाकरे यांनी ते उमेदवारी करणार का, कोणत्या पक्षाकडून लढणार, याविषयी मौन बाळगले आहे. शांतीगिरी महाराजही उमेदवारी करणार असल्याचे जय बाबाजी परिवारातर्फे सांगण्यात येत आहे. २००९ मध्ये महाराजांनी तेव्हाच्या औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मनसेमध्ये अद्याप उमेदवारीच्या पातळीवर शांतताच आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, जाहीर सभा, काळाराम मंदिरात दर्शन आणि रामकुंडावर गोदापूजन अशा कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन भाजपने केलेली वातावरण निर्मिती निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात कांदा प्रश्न, नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे, मुंबई ये-जा करणाऱ्या नाशिककरांसाठी सोयीची असलेली गोदावरी एक्स्प्रेस धुळ्याहून करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमधील असंतोष, घोषणा करुनही रेंगाळलेले विविध प्रकल्प हे प्रश्न सत्ताधाऱ्यांसाठी त्रासदायक ठरु शकतात.
लोकसभा मतदारसंघात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, सिन्नर, इगतपुरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी नाशिक शहरातील तीनही मतदारसंघात भाजप, देवळाली आणि सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, इगतपुरीत काँग्रेस असे पक्षीय बलाबल आहे.
२०१९ मध्ये उमेदवारांना मिळालेली मते
हेमंत गोडसे (शिवसेना) – ५, ६३, ५९९
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) – २, ७१, ३९५