नाशिक – देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी गड, श्री काळाराम मंदिर अशा प्रमुख धार्मिक ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. व्यवस्थापनांना पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या असून श्री काळाराम मंदिरात भाविकांकडील वस्तूंची तपासणी करुनच त्यांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळी भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. देशात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. धार्मिक स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सावधगिरी बाळगली जात आहे. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनाला येत असतात. सुट्यांमुळे त्यांची संख्या वाढली असल्याने पोलिसांच्या वतीने सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून कोणती खबरदारी घेतली जात आहे, याचा आढावा घेतला. मंदिराच्या प्रवेशव्दारांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. शुक्रवारी भाविकांकडील सर्व वस्तूंची तपासणी करुनच त्यांना मंदिरात सोडण्यात येत होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर येथे धातुशोधक यंत्रणेच्या माध्यमातून तसेच सुरक्षारक्षकांच्या मदतीने भाविकांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त वाढविण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे सुट्टीच्या काळात होणारी गर्दी नियंत्रित कशी राहील, यासाठी देवस्थान प्रयत्न करत असल्याचे विश्वस्त मनोज थेटे यांनी सांगितले. श्री सप्तश्रृंगी देवस्थानच्या वतीने गडावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस तसेच सीसीटीव्ही अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी देवी मंदिर आणि श्री काळाराम मंदिर ही प्रसिध्द मंदिरे आहेत. या ठिकाणी वर्षभर भाविकांचा राबता असतो. सुट्यांमुळे भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळे या सर्व ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.