नाशिक – महावितरणच्या नाशिक शहर विभाग दोन, इंदिरानगर कक्षाअंतर्गत शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या भारत नगर, कल्पतरूनगर, डीजीपीनगर या ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिन्याअंतर्गत असलेल्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यात असणारे वीज खांब आणि रोहित्र नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आठ ते १० जुलै असे सलग तीन दिवस सकाळी १० ते दुपारी दोन आणि १२ तारखेला म्हणजे शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे.
ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या या कामामुळे ११ केव्ही भारत नगर वाहिनी अंतर्गत – खोडेनगर, विठ्ठलमंदिर, वडाळा गाव, गणेश नगर, रहमत नगर, रविशंकर मार्ग या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. कल्पतरू नगर वाहिनी अंतर्गत अशोका मार्ग, गोदावरीनगर, कुरुडकरनगर, बनकर मळा, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, पखाल रोड, गोरे हॉस्पिटल, विधातेनगर, विठ्ठलमंदिर, पंडित रविशंकर मार्ग आणि डीजीपीनगर वाहिनी अंतर्गत साई संतोषी नगर, एसएन पार्क, साठेनगर, मदिनानगर, सादिकनगर, गुलशननगर, मुमताज नगर, म्हाडा कॉलनी, वडाळा गाव, मेहबूबनगर या भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज वाहिनी भूमिगत करण्याचे काम नियोजित वेळेआधीच पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग दोनकडून करण्यात आले आहे.
वीज पुरवठा बंदचा कालावधी
विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि वीज खांब व रोहित्र स्थलांतराच्या कामांसाठी इंदिरानगर कक्षांतर्गत जवळपास चार दिवस विशिष्ट कालावधीत वीज पुरवठा बंद राहणार आहे. प्रारंभी आठ ते १० जुलै या सलग तीन दिवसात दररोज सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना वीज पुरवठा होणार नाही. तसेच शनिवारी म्हणजे १२ जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.