नाशिक: जिल्ह्यात वळिवाचा फटका बसल्याने त्र्यंबक, पेठ, हरसूल, सुरगाणा या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर आंबा झाडांचे, काैलारू घरांचे नुकसान झाले. शासन दरबारी पंचनाम्याचे सोपस्कार पार पडले असले तरी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे.
मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक, पेठ, हरसूल, सुरगाणासह अन्य भागाला वळिवाच्या पावसाचा फटका बसला. पिंपळसोंड, उंबरपाडा, तातापाणी, गोणदगड, डांग सीमावर्ती भागात या पावसाचे प्रमाण अधिक होते. आंबा फळबागेचे आणि घरांचे नुकसान झाले. पशुधनाची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. याविषयी त्र्यंबक तालुक्यातील सावळीपाडा येथील गणा सहारे यांनी माहिती दिली. पाऊस मागच्या आठवड्यात झाला. अजून पंचनामा झाला नाही. मागील वर्षा गारांचा पाऊस झाला, तेव्हा पंचनामा झाला होता. मात्र त्यावेळीही पंचनाम्याचे सोपस्कार पार पडूनही पैसे खात्यावर जमा झालेच नाही. आंबा झाडांसह घराचे कौल व अन्य नुकसान झाले असले तरी अद्याप मदत आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : मनमाड: युनियन बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
हिरामण सहारे यांनी हाच मुद्दा पुढे नेत अवकाळी पावसाने तोंडापुढचा घास हिरावला गेला असल्याचे सांगितले.. शेतात आंब्याची झाडे काेसळली आहेत. चार दिवसांपूर्वी कृषी अधिकारी येऊन गेले. परंतु, पुढे काय, हा प्रश्न आजही कायम आहे. शेतातील ९० झाडांच्या ७० ते ७५ जाळ्या आंबे शेतात पडून आहेत. व्यापारी येऊन तो माल अगदी कमी किंमतीत मागत आहेत. जी जाळी दीड ते दोन हजार रुपये जाते, ती आम्ही ३०० रुपये दराने विकत आहोत. त्यातही व्यापारी हापूस, केशर घेऊन जात आहे. गावठी आंबा तसाच पडून आहे. सरकारी मदत मिळत नाही. शेतात माल सडण्यापेक्षा व्यापाऱ्याकडून अडवणूक होऊनही आम्ही आंबे विकत असल्याचे सहारे यांनी नमूद केले. त्र्यंबक, पेठ, हरसूल, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांमध्ये वळिवाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू
भरपाई मिळण्याची अपेक्षा
अवकाळी किंवा वळिवाच्या पावसाने दरवर्षीच कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. पंचनामा झाल्यानंतर नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्याची आस लागून असते. परंतु, बहुतेक वेळा पंचनामे होऊनही भरपाई मिळत नसल्याचा काही जणांचा अनुभव आहे. त्र्यंबक, पेठ, हरसूल, सुरगाणा या भागात पावसाळ्यात जसा भरमसाठ पाऊस कोसळतो, त्याप्रमाणे उन्हाळ्यात टंचाई जाणवत असते. या भागात नुकसानीचे पंचनामे पुन्हा एकदा करण्यात येत असून किमान यावेळी तरी नुकसानीची भरपाई त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.